त्रिशुल सोसायटीतील रस्त्याच्या काम रखडले
सासवड, ता. २९ : शहरातील त्रिशुल सोसायटीत होत असलेल्या काँक्रिट रस्त्याचे काम जवळपास दीड महिन्यांपासून रखडले आहे. रस्ता खोदून ठेवल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सोसायटीतील नागरिकांनी बुधवारी (ता. २९) सायंकाळी पालिकेत येऊन मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला. नगरपालिकेच्या प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे आणि मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी त्रिशुल सोसायटीमध्ये जात पाहणी केली.
रस्ता उकरल्याने ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत आहे. आम्हाला रस्ता नको, मुरूम टाकून बुजवून द्या, रस्त्याने चालणेही अवघड झाले आहे, असे सांगत एका महिन्यात गटार वाहिनी आणि रस्त्याचे काम करावे असे नागरिकांनी मागणी केली. दीड महिन्यांपूर्वी कामाला सुरुवात झाल्यानंतर रस्ता खोदण्यात आला, मात्र त्यानंतर गटार वाहिनीच्या कामासाठी मजूर नसल्याचे कारण पुढे करून काम थांबले आहे. यामुळे दसरा आणि दिवाळीसारखे सणही येथील नागरिकांना याच परिस्थितीत साजरे करावे लागले. दुचाकीवरून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. याचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि लहान मुलांना बसत आहे.
याबाबत नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विचारणा केली असता, ड्रेनेजचे काम नगरपरिषदेचे असल्याचे सांगण्यात आले. तर संबंधित ठेकेदाराकडून, मजूर दिवाळीसाठी गावी गेले असून, ते परत आल्यावर काम सुरू होईल, असे उत्तर नागरिकांना देण्यात आले.
संबंधित ठेकेदाराला तातडीने काम करण्याच्या सूचना दिल्या असतानाही हलगर्जीपणा होत असल्याने आता कारवाई करणार आहे. त्याचे काम बंद करून आठ दिवसांत नगरपालिकेकडून गटार वाहिनी जोडून देण्यात येईल. त्यानंतर रस्त्याचे काम केले जाईल.
- डॉ. कैलास चव्हाण, मुख्याधिकारी
पालिकेने तातडीने सहा दिवसांत गटार वाहिनीचे काम पूर्ण करावे. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने रस्त्याचे काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले जाईल.
- वर्षा लांडगे, उपविभागीय अधिकारी, पुरंदर
महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या
सासवड नगरपालिकेच्या बांधकाम, आरोग्य आणि पाणीपुरवठा प्रमुख या तीनही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून, ही महत्त्वाची पदे तीन आठवड्यांपासून रिक्त आहेत. मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याकडे कोणाचेही लक्ष नसून, सध्या शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, घंटागाड्यांची अक्षरशः बोंब झाली आहे.
05927

