सासवडमधील अवैध धंद्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

सासवडमधील अवैध धंद्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Published on

सासवड, ता. २ : सासवड (ता. पुरंदर) शहरात गुन्हेगारी, अवैध धंदे वाढत आहेत. मात्र, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सासवडमधील या समस्यांवर प्रशासन लक्ष देणार का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
सासवडमधील प्रशासकीय कारभाराची गंभीर व्यथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. उदयकुमार जगताप यांनी समाज माध्यमातून मांडली आहे. उपविभागीय पोलिस कार्यालयासमोर असलेल्या खंडोबानगर झोपडपट्टीतील रहिवाशांकडून नुकताच एका कंत्राटदारावर हल्ला झाल्याच्या घटनेने, डॉ. जगताप यांनी १२ ते १३ वर्षांपूर्वी पालिकेला पत्राद्वारे झोपडपट्टीबद्दल व्यक्त केलेली भीती खरी ठरत असल्याचे म्हटले आहे.
अनेक वर्षांपासून ही झोपडपट्टी गांजा, गावठी दारू आणि जुगार (चक्री) यांसारख्या अवैध धंद्याचे केंद्र बनली आहे. वर्ष २०१२ पासून वारंवार तक्रारी करूनही गृहखात्याने केवळ तात्पुरत्या कारवाईच्या पलीकडे काहीही केले नाही. यामुळे गुन्हेगारांना कायद्याची भीती उरली नाही, असे डॉ. जगताप यांचे मत आहे.

सासवडच्या विकास आराखड्यात सर्व्हे नं. ६२० मधील ९६ गुंठे जागा नगरपालिकेने शॉपिंग सेंटरसाठी आरक्षित ठेवली आहे. पण याच जागेवर झोपडपट्टी वसली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने येथे रस्त्यासाठी सुधारणा निधी मंजूर केला. संबंधित अधिकाऱ्यांनी आरक्षणाची माहिती न घेता निधी खर्च करणे, ही मोठी शोकांतिका असल्याचे डॉ. जगताप म्हणाले. झोपडपट्टीवासीयांनी संरक्षक भिंत पाडून पूर्वेकडील एका बाजूचा रस्ता बंद केला असल्याचेही ते म्हणाले.
डॉ. जगताप यांनी शहरातील शेतकऱ्यांची दुर्दशा देखील मांडली आहे. विकास आराखड्यात ६० टक्के भूभाग ‘शेती झोन’ असतानाही पाणीपुरवठा योजना करण्याचे नगरसेवकांना कळले नाही. सासवड शहरी भागात मोडत असल्याने, येथील शेतकऱ्याला कृषी खात्याच्या कोणत्याही योजनांचा फायदा मिळत नाही. नगरपालिकेचा वाढता कर, महागाई आणि शेतमालाचा अस्थिर बाजारभाव यामुळे तरुणवर्ग शेती विकू लागला आहे.

सासवडकरांच्या प्राथमिक गरजा
​डॉ. जगताप यांनी सासवडकरांना कोट्यवधींचे मोठे प्रकल्प नकोत, तर पिण्याचे पाणी, शेतीला वीज- पाणी, सुरक्षितता, दर्जेदार रस्ते, आणि शांतता यांसारख्या मूलभूत सुविधांची गरज असल्याचे सांगत, सासवडकर नागरिकांना गुन्हेगारांचे अड्डे थांबवण्यासाठी ग्रामसभा घेऊन आपल्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची वेळ आली आहे, असे आवाहनही केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com