पालखी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच
सासवड, ता. २ : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग, तसेच सासवड बाह्यवळण मार्गावरील अपूर्ण कामे आणि सुरक्षेच्या अभावामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. या अपघातांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागत आहे.
दिवे गावच्या काळेवाडी (ता. पुरंदर) येथे शुक्रवारी (ता. ३१) सायंकाळी रस्ता ओलांडताना महिलेचा भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. तीन महिन्यांपूर्वी याच ठिकाणी एका ज्येष्ठ नागरिकालाही आपला जीव गमवावा लागला होता. लोकवस्ती रस्त्यालगत असतानाही उड्डाणपूल न झाल्याने संतप्त नागरिकांतून आता कायमस्वरूपी तोडगा म्हणून तत्काळ भूमीगत रस्ता बांधण्याची मागणी होत आहे.
महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यामुळे वाहने अत्यंत वेगाने धावतात. परिसरातील अन्य गावे रस्त्यापासून काही अंतरावर आत असताना, काळेवाडीतील लोकवस्ती मात्र रस्त्यालगत असून, या परिसरात अनेक ढाबे, हॉटेलही आहेत. यामुळे या ठिकाणी रस्ता ओलांडणे अत्यंत धोकादायक बनले आहे.
टी अँड टी कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक राजेंद्र ढगे यांनी चंदन टेकडी आणि बोरावकेमळा या दोन्ही ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन असल्याचे सांगितले आहे. मात्र, अद्याप अनेक महिन्यांनंतरही कोणतेही काम सुरू झालेले नाही.
चंदनटेकडी, बोरावकेमळा अपघाताचे केंद्र
काळेवाडीसह सासवड बाह्यवळणावरील चंदन टेकडी आणि बोरावकेमळा यांसारखी अत्यंत संवेदनशील ठिकाणे अपघाताचे केंद्र बनत आहेत.
बाह्यवळणावरील त्रिकोणी रस्ते आणि इतर अपूर्ण कामांमुळे येथे सतत अपघात घडत असून, या रस्त्याचे उद्घाटन होण्यापूर्वीच एका नागरिकाला आपला जीव गमवावा लागला आहे.
काळेवाडी येथील आरटीओ कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने उड्डाणपूल उभारला, मग अपघातांचे केंद्रबिंदू ठरणाऱ्या अशा महत्त्वाच्या ठिकाणी उड्डाणपूल का बांधला नाही?
- संतोष ए. जगताप, सामाजिक कार्यकर्ते
बोरावकेमळा बाह्यवळणावरून घोडकेमळा - खळद आणि ताथेवाडीहून सासवडकडे जाताना मुख्य महामार्गावरून काही मीटर अंतर उलट्या दिशेने धोकादायकपणे जावे लागते.
- संदीप जगताप, रहिवासी, ताथेवाडी
पाच महिन्यांपूर्वीच महामार्ग प्राधिकरणाकडे काळेवाडी येथे उड्डाणपुलाची मागणी केली आहे. मात्र, अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे आता वाळूंज फाटा येथे सुरू असलेल्या भूमीगत मार्गाप्रमाणे काळेवाडी येथेही तातडीने भूमीगत मार्ग करून देण्याची मागणी दिवे ग्रामपंचायत व ग्रामस्थ करणार आहेत. हे काम झाल्यास, आघातांवर नियंत्रण मिळवता येईल आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची चिंता दूर होईल.
- रूपेश राऊत, सरपंच दिवे
05950
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

