पुरंदर... आजी माजी आमदार आणि तालुकाध्यक्षांच्या प्रतिक्रिया
पुरंदरची स्वाभिमानी जनता यावेळीही कोणत्याही जातीपातीच्या राजकारणाला बळी न पडता, केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावरच आपले मोलाचे मत देणार आहे. २००९ पासून आपण जो विकासाचा रथ ओढला, त्यातूनच गुंजवणीचे पाणी, आधुनिक रस्त्यांचे जाळे, जलसिंचन योजना आणि पुरंदरच्या भविष्याचा कायापालट करणारा प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ यांसारखी स्वप्ने साकार होत आहेत.
मध्यंतरीच्या काळात तालुक्यातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प आणि विकासकामे दुर्दैवाने ठप्प झाली होती; मात्र आता हीच कामे पुन्हा ‘फुल स्विंग’ मध्ये सुरू झाली असून जनतेने गतिमान प्रशासनाचा अनुभव घेतला आहे. प्रगतीचा हा झंझावात पुरंदरची जनता प्रत्यक्ष पाहत आहे. त्यामुळेच, विकासाच्या या भक्कम जोरावर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना जनता भरघोस मतांनी विजयी करेल.
- विजय शिवतारे, आमदार, पुरंदर-हवेली
पुरंदर तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीचा ध्यास घेऊन भाजपने ‘विकासाच्या मुद्द्याला’ केंद्रस्थानी ठेवून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली देश आणि राज्यात विकासाची जी गंगा वाहत आहे, त्याचा थेट लाभ पुरंदरच्या मातीला मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जिल्हा परिषदेचे चारही गट आणि पंचायत समितीच्या आठही गणांतील आमचे उमेदवार अत्यंत कार्यक्षम आणि जनसंपर्क असलेले असून, ते या निवडणुकीत मोठे मताधिक्य मिळवून विजयी होतील, असा आम्हाला ठाम विश्वास आहे. पुरंदर पंचायत समितीवर या वेळेस सक्षमपणे ‘कमळ’ फुलणार असून, केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी भाजपच्या ताकदीचा फायदा तालुक्याच्या दुर्गम भागातील नागरिकांना आणि पायाभूत सुविधांना मिळण्यासाठी मतदार नक्कीच भाजपच्या पारड्यात आपले कौल देतील. विकासाची ही निरंतर प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी जनतेचा आशीर्वाद आणि पाठिंबा भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील अशी खात्री आहे.
- संजय जगताप, माजी आमदार, पुरंदर-हवेली
भाजपने पुरंदर तालुक्यात अत्यंत नियोजनबद्ध आणि सकारात्मक प्रचार राबवला असून, या वेळेस विजयाचे कमळ नक्कीच फुलणार असा विश्वास आहे. जिल्हा परिषदेचे चारही गट आणि पंचायत समितीच्या आठही गणांतील भाजपचे सर्व उमेदवार अत्यंत ताकदवान आणि जनसंपर्क असलेले आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादांच्या निधनामुळे पक्षादेशाचे तंतोतंत पालन करण्यात आले. कोणतीही मोठी सभा न घेता, अत्यंत शांततेत मात्र प्रभावीपणे घराघरांत प्रचार पोहोचवण्यात आला. माजी आमदार संजय जगताप, अशोक टेकवडे, बाबा जाधवराव, गंगाराम जगदाळे, सचिन लंबाते आणि गिरीष जगताप यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले आहे.
याबरोबरच, पुणे दक्षिण जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ३५ पैकी ३३ जागांवर आम्ही उमेदवार उभे केले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात भाजपला अनुकूल वातावरण असून, पुरंदरमधील जिल्हा परिषदेच्या सर्व जागा आणि पंचायत समितीच्या जास्तीत जास्त जागांवर भाजपचा विजय निश्चित आहे.
- चंद्रशेखर वढणे, जिल्हाध्यक्ष, भाजप (दक्षिण पुणे)
पुरंदर-हवेली विधानसभा क्षेत्रात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने अत्यंत सकारात्मक वातावरण आहे. उपमुख्यमंत्री अजितदादांच्या निधनामुळे जनमानसात असलेली सहानुभूतीची लाट आणि दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आल्याने मिळालेली संघटनात्मक बळकटी यामुळे पक्षाची ताकद द्विगुणित झाली आहे. खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदारांचा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे. प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे, अमित झेंडे आणि उत्तम धुमाळ यांसारखे खंबीर उमेदवार मैदानात असल्याने जिल्हा परिषदेच्या तीन आणि पंचायत समितीच्या किमान सहा जागांवर राष्ट्रवादीचा विजय निश्चित मानला जात आहे. जरी काही गावांमध्ये दोन उमेदवारीमुळे मतविभाजनाचे आव्हान समोर असले, तरी राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार अतिशय तगडी लढत देऊन मोठी मते घेतील, असा ठाम विश्वास आहे.
- वामनराव जगताप, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, पुरंदर - हवेली विधानसभा
पुरंदरच्या राजकीय रणांगणात या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय निश्चित असून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात जरी धनशक्तीचा आणि पैसेवाल्यांचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाला असला, तरी तालुक्यातील सामान्य जनता आणि सुजाण विचारांची माणसं केवळ प्रामाणिक कार्यालाच साथ देतील, असा विश्वास आहे. तालुक्यातील चारही गटांत पक्षासाठी अतिशय अनुकूल वातावरण असून, पुरंदरची पंचायत समिती हस्तगत करण्यासोबतच पुणे जिल्हा परिषदेवरही राष्ट्रवादीचीच सत्ता येईल.
- माणिकराव झेंडे पाटील, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष
पुरंदरच्या विकासाचा अजेंडा आणि जनतेचा विश्वास या जोरावर जिल्हा परिषदेच्या चारही जागांसह पंचायत समितीच्या आठही गणांत शिवसेनेचा भगवा दिमाखात फडकेल. आमदार विजय शिवतारे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली तालुक्यात रस्ते, पाणी आणि मूलभूत सुविधांचे जे जाळे विणले गेले आहे, त्याची पावती जनता जनार्दन आपल्या आशीर्वादाने नक्कीच देईल. विशेषतः प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, गुंजवणी पाणी योजना आणि पुरंदर उपसा सिंचन योजनेचे यशस्वी काम यांसारख्या मोठ्या विकासप्रकल्पांमुळे तालुक्याचे चित्र बदलत असून, या विकासकामांचा सकारात्मक परिणाम शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच्या बाजूने होताना दिसत आहे. विकासाच्या मुद्द्यावर ठाम असलेल्या जनतेचा पाठिंबा शिवसेनेच्या पाठीशी असून तालुक्यात पुन्हा एकदा विजयाची परंपरा कायम राहील, अशी खात्री आहे.
- उमेश गायकवाड, शिवसेना, पुरंदर तालुकाप्रमुख
पुरंदर तालुक्याच्या राजकीय पटलावर सध्या प्रत्येक गट आणि गणात अत्यंत अटीतटीच्या लढती होत असून, मशालीच्या चिन्हावर निवडणूक लढवणारी शिवसेना आपली जिल्हा परिषदेची जागा निश्चितपणे निवडून आणेल. ही निवडणूक प्रलोभने, सत्ताधाऱ्यांची यंत्रणा आणि शक्तिस्थळांच्या प्रभावाखाली खेळली जात असून, लोकशाहीच्या निकोप वाढीसाठी या पद्धतीमध्ये बदल होणे काळाची गरज आहे. उपमुख्यमंत्री अजितदादांच्या मागे असलेली सहानुभूती निकालात परावर्तित होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी महायुतीचे पारडे जड राहण्याचे संकेत मिळत आहेत. या सर्व चुरशीच्या संघर्षात अखेर जनतेला अभिप्रेत असलेला आणि लोकशाहीला साजेसा निकाल लागेल, अशी अपेक्षा आहे.
- अभिजित जगताप, तालुकाप्रमुख, शिवसेना (उ.बा.ठा.)
पुरंदरच्या राजकीय मैदानात काँग्रेसने यावेळी सर्वसामान्य कुटुंबातील चेहऱ्यांना संधी देऊन परिवर्तनाची साद घातली असून, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रिंगणात उतरलेले आमचे आठही उमेदवार पक्षाचे भविष्य उज्ज्वल करतील. हे सर्व उमेदवार तळागाळातील कार्यकर्ते असून, पक्षवाढीसाठी त्यांनी दिलेले योगदान आणि जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली त्यांची कटिबद्धता हीच काँग्रेसची खरी ताकद आहे. आपल्या मातीतील या सामान्य कार्यकर्त्यांचे सामाजिक आणि राजकीय भवितव्य या निवडणुकीतून घडणार असून, खासदार राहुल गांधी यांचे सर्वसमावेशक भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि पुरंदरच्या विकासाला नवी गती देण्यासाठी काँग्रेसचा प्रत्येक शिपाई सज्ज झाला आहे. जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले हे उमेदवार पुरंदरमध्ये निश्चितच प्रभावी कामगिरी करतील, अशी खात्री आहे.
- साहेबराव फडतरे, अध्यक्ष, पुरंदर तालुका काँग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

