

सासवड, ता. १० : सासवड नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांसाठी विरंगुळ्याचे साधन असलेल्या सार्वजनिक उद्यानांची स्थिती सध्या संमिश्र पहायला मिळत आहे. शहरात एकूण सहा उद्याने असून, त्यातील चार उद्याने वापरात असली, तरी दोन महत्त्वाची उद्याने देखभालीअभावी बंद असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
उद्यानांची सद्यस्थिती व दुरवस्था :
शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, सोपाननगरमधील नाना-नानी पार्क, राणी लक्ष्मीबाई उद्यान आणि गणेशबाग ही उद्याने सध्या सुरू आहेत. आंबेडकर उद्यानात चोख स्वच्छता आणि सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे. मात्र, राजमाता जिजामाता उद्यान आणि आचार्य अत्रे उद्यान अनेक दिवसांपासून बंद असल्याने नागरिक आणि मुलांची गैरसोय होत आहे. परिणामी, मुलांना वाघ डोंगर येथील वनविभागाच्या उद्यानाचा आधार घ्यावा लागत आहे. दिवंगत नगराध्यक्ष चंदुकाका जगताप यांच्या कार्यकाळात पालिकेच्या उद्यानांसह पालखी तळ, विद्यालये व इतर जागा संरक्षक भिंतींनी सुरक्षित केल्या आहेत.
‘‘उद्यानांतील खेळणी जुनी आणि धोकादायक झाली आहेत. प्रशासनाने तातडीने नवीन खेळणी बसवावीत आणि सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही तसेच पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहांची सोय करावी’’, असे येथील पालक अर्चना पवार म्हणाल्या.
मूलभूत सुविधांचा अभाव :
- उद्यानांमध्ये फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नाही. पालखी तळावर स्वच्छतागृह असले तरी, इतर उद्यानांमध्ये स्वच्छतागृहांची अडचण भासत आहे.
- बहुतांश उद्यानांमधील खेळणी आणि बाकड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे.
- डॉ. आंबेडकर उद्यान आणि पालखी तळावरील जॉगिंग ट्रॅक सुस्थितीत असून त्याचा शेकडो नागरिक लाभ घेत आहेत.
सुरक्षा आणि गैरप्रकार :
आचार्य अत्रे उद्यान बंद असल्याने या ठिकाणी तळीरामांचा वावर वाढला आहे, तर सुरू असलेल्या उद्यानांमध्ये प्रेमीयुगुलांच्या वावरामुळे सहकुटुंब येणाऱ्या नागरिकांना संकोच वाटत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस गस्त आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक बनले आहे.
खुल्या व्यायामशाळा व फिटनेस सुविधा :
शहरात पालखी तळासह पालिकेची विद्यालये आणि विविध सोसायट्यांच्या ‘ओपन स्पेस’मध्ये ‘ओपन जिम’ सुरू केली आहे. पालखी तळावरील जिम आणि ट्रॅकच्या स्वच्छतेमुळे तरुण पिढी आणि आरोग्यप्रेमी नागरिक या सुविधेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहेत.
सासवडमध्ये पालखी तळासह शाळा आणि सोसायट्यांच्या मोकळ्या जागेतील ‘ओपन जिम’ सुविधेचा नागरिक व तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहे. विशेषतः पालखी तळावरील जॉगिंग ट्रॅक आणि जिममुळे सकाळी आणि संध्याकाळी गर्दी असते. याबरोबरच सर्व उद्याने खुली झाल्यास नागरिकांना अधिक चांगल्या प्रकारे विरंगुळा मिळेल.
- मोहन चव्हाण, ज्येष्ठ नागरिक (निवृत्त आरोग्य अधिकारी)
बंद असलेली उद्याने साफसफाई, साहित्याची दुरुस्ती आणि सीसीटीव्ही बसवून पुन्हा सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लवकरच नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील.
- राजन जगताप, सभापती, आरोग्य समिती
शहरातील सर्व उद्याने विकसित करण्यासाठी धोरणात्मक निर्णय झाला असून, सर्व उद्यानांचे नूतनीकरण प्रस्तावित आहे. ‘नमो उद्यान’ योजनेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे.
- डॉ. कैलास चव्हाण, मुख्याधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.