महिला नेतृत्वाच्या उदयाचा संकेत
खडकाळा-कार्ला जिल्हा परिषद गट
महिला नेतृत्वाच्या उदयाचे संकेत
आरक्षणातील फेरबदल, नव्या भौगोलिक रचनेमुळे निर्माण झालेली मतदारसंघाची ओळख आणि पक्षांतर्गत समन्वय यामुळे खडकाळा-कार्ला जिल्हा परिषद गटाची निवडणूक यावेळेस अत्यंत रंगतदार, अनिश्चित आणि महिला नेतृत्वाच्या उदयाची संकेत देणारी ठरणार आहे.
- विजय सुराणा
ख डकाळा-कार्ला जिल्हा परिषद गटात यावेळी नवे आरक्षण आणि पुनर्रचनेमुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल झाले आहेत. वडगाव नगरपंचायतीच्या स्थापनेनंतर झालेल्या नव्या आराखड्यामुळे या गटाची भौगोलिक आणि सामाजिक रचना पूर्णपणे बदलली आहे. कामशेत ते कार्ला असा विस्तृत पट्टा आता या गटात समाविष्ट झाला असून, एका टोकाला कामशेतसारखे विकसित शहर आणि दुसऱ्या बाजूला पारंपरिक ग्रामीण भाग अशी मिश्र परिस्थिती तयार झाली आहे.
यावेळी हा गट सर्वसाधारण महिला आरक्षणासाठी राखीव ठरल्याने अनेक इच्छुक पुरुष उमेदवारांचे गणित बिघडले आहे. परिणामी, नवीन महिला नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत अपेक्षित आहे. शिवसेनेची भूमिका या लढतीत निर्णायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
मागील निवडणुकीत अपक्ष बाबूराव वायकर यांनी विजय मिळवला होता; तर भाजपचे रामदास वारिंगे आणि राष्ट्रवादीचे सुनील ढोरे पराभूत झाले होते. मात्र, आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेमुळे यावेळी संपूर्ण चित्र बदलले आहे. कामशेत गण अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने अनेक अनुभवी उमेदवारांनी माघार घेतली आहे; तर नव्या महिला उमेदवारांनी समाजमाध्यमांद्वारे आपली उपस्थिती दाखविण्यास सुरुवात केली आहे.
या गटात एकूण ५७,७७७ मतदार असून, खडकाळा गणात ३९, १०३ आणि कार्ला गणात १८, ६७४ मतदार आहेत. ग्रामीण भागाचा प्रभाव जास्त असल्याने शेतकरी वर्गाचे वर्चस्व स्पष्ट दिसते. त्यामुळे सिंचन, शेतीसाठी वीज, पिकांचे भाव, आणि पाणीपुरवठा यासारखे प्रश्न निवडणुकीच्या अजेंड्यावर अग्रस्थानी राहतील.

