शेळी, बोकडांच्या आवकेत तळेगावमधील बाजारात वाढ
तळेगाव ढमढेरे, ता.२९: तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले उपबाजारात दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर सोमवारी (ता.२९) शेळी, मेंढी व बोकडांची आवक वाढली होती.
बाजारात सुमारे १ हजार शेळी, बोकड व मेंढ्यांची विक्री झाली. एका शेळीला ७ हजार ते १८ हजार रुपये पर्यंत, बोकडाला १० हजार रुपये ते २५ हजार रुपयांपर्यंत तसेच मेंढीला ४ हजार ते ८ हजार रुपयेपर्यंत बाजारभाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक देविदास मिसाळ, सचिव अनिल ढोकले व अनिल ढमढेरे यांनी दिली.
कोंबडीचा बाजारभावही वधारला असून, ४०० ते ५०० रुपयांपर्यंत कोंबड्यांची विक्री करण्यात आली. गावरान अंड्याला नगाला १० रुपये इतका बाजारभाव मिळाला.
दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर दसरा सणानिमित्त शेळी, बोकड व मेंढीला समाधानकारक बाजारभाव मिळाल्याने मेंढपाळ, शेतकरी व पशुपालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
येथील बाजारात पुणे, मुंबई, ठाणे, अलिबाग, अहिल्यानगर, सोलापूर, सातारा आदी ठिकाणचे व्यापारी खरेदीसाठी आले होते. तसेच शिरूर, दौंड, हवेली, अहिल्यानगर, खेड आदी तालुक्यातील पशुपालकांनी शेळी, बोकड व मेंढी विक्रीसाठी आणले होते.
08183