कासारी, टाकळी भीमात बिबट्याचे दर्शन
तळेगाव ढमढेरे, ता.१७ : कासारी व टाकळी भीमा (ता. शिरूर) परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे. रविवारी (ता. १६) कासारी येथील जोशी फार्म जवळ ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाले. तसेच टाकळी भीमा येथील बळोबाचीवाडी येथे बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्याच्या दर्शनाने शेतकरी, शेतमजूर, ऊस तोडणी कामगार, शालेय विद्यार्थी भयभीत झाले आहेत.
गेल्या दोन महिन्यापासून कासारी परिसरात बिबट्याने थैमान घातले असून मेंढपाळांच्या शेळ्या आणि मेंढ्या तसेच पाळीव कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला करून ताव मारला आहे. बिबट्याने पाळीव प्राणी भक्ष्य केल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यापूर्वी निमगाव म्हाळुंगी येथे गेल्या आठवड्यात शेळ्यांवर हल्ला करून बिबट्याने नुकसान केले आहे. निमगाव म्हाळुंगी येथे वनविभागातर्फे पिंजरा लावण्यात आला आहे. गेल्या महिन्यात कासारी येथेही वन विभागाने पिंजरा लावला होता; परंतु पिंजऱ्याकडे बिबट्या फिरकलाही नाही. येथील पिंजरा काढून विठ्ठलवाडी येथे ठेवण्यात आला. दोन दिवसांपूर्वी विठ्ठलवाडीतही एका चारचाकी वाहनाच्या पाठीमागे बिबट्याने पळ काढला होता. तर तळेगाव ढमढेरे परिसरातही बिबट्याची दहशत वाढली असून वारंवार ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन होत आहे. दरम्यान, तळेगाव ढमढेरे, धानोरे, विठ्ठलवाडी, टाकळी भीमा, निमगाव म्हाळुंगी, कासारी आदी परिसरात बिबट्या पकडण्यासाठी पिंजऱ्याची व्यवस्था वन विभागाने करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

