शिक्रापूर- न्हावरा महामार्गाला विरोध
तळेगाव ढमढेरे, ता. ९ : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर- न्हावरा या सुमारे २८ किलोमीटर लांबीच्या सिमेंट काँक्रिटच्या चारपदरी महामार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. मात्र, तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील बाजारतळातून, तसेच लोक वस्तीतून हा रस्ता जात असल्याने काही ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करून विरोध दर्शवला आहे.
येथील एसटी स्थानक चौकातील रस्त्याच्या दोन्ही बाजूची अतिक्रमणे प्रशासनाने शांततेच्या मार्गाने हटविली आहेत. येथील दुकानदारांनी पत्र्याची शेड स्वतःहून काढून घेतली आहेत. जेसीबीच्या साहाय्याने प्राथमिक आरोग्य केंद्र व हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारकाच्या समोरील झाडे तोडली आहेत. असे असले तरी हा रस्ता लोकवस्ती व बाजार मैदानातून जात असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली करून, त्यास विरोध केला आहे. बाजार तळातील पूर्वेच्या बाजूची सर्व दुकाने रस्त्याच्या जागेत येत असून, ती हटविण्यात येणार आहेत. या दुकानदाराचे पुढे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, दर सोमवारी भरणारा आठवडा बाजार कोठे भरणार? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. हा रस्ता लोकवस्तीतून जात असल्याने शालेय विद्यार्थी, व्यावसायिक, व्यापारी यांना अडचणीचा होणार आहे. पुढील धोका टाळण्यासाठी हा रस्ता गावातून न नेता पर्यायी मार्गाने करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
दरम्यान, शिक्रापूर- न्हावरा हा सुमारे २८ किलोमीटर लांबीचा काँक्रिटीकरणाचा महामार्ग केंद्र शासनामार्फत तयार करण्यात येत असून, त्यासाठी ३९६ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. जुलै २०२६ पर्यंत हा महत्त्वाकांक्षी चारपदरी काँक्रिटीकरणाचा रस्ता पूर्ण करण्याचे नियोजन झाले असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग उपविभागाचे शाखा अभियंता ऋषिकेश हजारे यांनी दिली.
रस्त्याचे काम प्रगती पथावर
न्हावरा ते घोलपवाडी व पुढे निमगाव फाटा पर्यंत रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. चार दिवसापासून तळेगाव ढमढेरे येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूची टपऱ्यांची अतिक्रमणे काढून त्या ठिकाणी जेसीबीच्या साह्याने साफसफाई करण्यात येत आहे तसेच शिक्षक भवनापासून पुढे शिक्रापूरकडे काही प्रमाणात रस्ता उकरण्यात आला आहे.
दोन्ही बाजूची अतिक्रमणे हटवण्यात येणार
शिक्रापूर- तळेगाव ढमढेरे या मोठ्या लोकसंख्येच्या गावांमधील रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असून, लवकरच शिक्रापूर येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूची अतिक्रमणे हटवण्यात येणार आहेत. तळेगाव ढमढेरे- शिक्रापूर या गावातून सध्याच्या रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूने ११-११ मीटर चारीसह सुमारे २२ मीटर काँक्रिटचा रस्ता रुंद असून, फेब्रुवारी- मार्च २०२६ पर्यंत रस्त्याचे काम प्रस्तावित आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीतर्फे येथील शासकीय जागेत व्यापार संकुलाची लवकर उभारणी करावी, अशी मागणी टपरीधारक व ग्रामस्थांची आहे.
तळेगाव ढमढेरे ते शिक्रापूर हा रस्ता नियोजित पूर्वीच्याच मार्गाने होणार असून, सध्या तरी या रस्त्याला पर्यायी रस्ता करणे शक्य नाही. जेथे अडथळा असेल किंवा जेथे नागरिकांनी विरोध केला असेल त्यांच्यामध्ये समन्वय साधून मार्ग काढला जाईल. तळेगाव ढमढेरे येथील ग्रामस्थांनी रस्त्याला विरोध केला असल्याचे निवेदन प्राप्त झाले असून, दोन- तीन दिवसात पत्रव्यवहार करून संबंधितांशी व प्रशासनाशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल.
- ऋषिकेश हजारे, शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग
08441
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

