कासारी फाटा येथे कंटनेरचा अपघातात
तळेगाव ढमढेरे, ता. १० : पुणे- अहिल्यानगर महामार्गावर कासारी फाटा (ता. शिरूर) येथील चौकात फुले घेऊन पुण्याकडे चाललेल्या पिकअपला कंटेनरने पाठीमागून जोरात धडक दिल्याने झालेल्या विचित्र अपघातात एक महिला ठार झाली असून, तिघेजण जखमी झाले आहेत. यासंदर्भात पिकअप चालक तेजस विलास पंदरकर (रा. पिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शिक्रापूर पोलिस व फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. ९) रात्रीच्या सुमारास पिंपळगाव पिसा येथून गुलटेकडी येथील बाजारात शेवंतीची फुले घेऊन जाणाऱ्या पिकअपला (क्र. एमएच १२ एसएक्स ५२२०) कासारी फाटा येथील चौकात पाठीमागून वेगात येणाऱ्या कंटेनरने (क्र. जीजे ०३ सीयु ३९००) जोरात धडक देऊन पुढे पुणे बाजूकडून येणाऱ्या किया मोटारीस (क्र. एमएच १४ जेआर ००७०) धडक दिली. यावेळी रस्ता ओलांडण्यासाठी दुसऱ्या बाजूला उभा असलेल्या महिलेला कंटेनरने धडक देऊन पुढे चहाच्या टपरीजवळ थांबलेल्या दोन दुचाकींना (क्र. एमएच १२ एक्सएफ ४५३५ व एमएच १२ डब्ल्यूएफ ५०५७) धडक देऊन कंटेनर चहाचे टपरीत घुसला. कंटेनरच्या या विचित्र अपघातात फुलाने भरलेला पिकअप रस्त्यावर एका बाजूने उलटला, तर मोटार, दुचाकीसह चहाच्या टपरीचे मोठे नुकसान झाले आहे.
या अपघातात चंद्रकला संदीप मुळे (वय ६५, रा. केज, जि. बीड) या ज्येष्ठ महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांना शिक्रापूर येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचा जागेवरच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
तसेच, अपघातग्रस्त मोटारीतील जयवंत रानुजी भाकरे, विजया जयवंत भाकरे व रामदास देवराम भाकरे हे एकाच कुटुंबातील तिघेजण जखमी झाले आहेत. जखमींना शिक्रापूर येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे.
दरम्यान, कंटेनर चालक सरफराज बशीरभाई नरसलीया (वय ३८, रा. भगवतीबरा, राजकोट, गुजरात) याने रात्रीच्या वेळी नशेत हायगईने कंटेनर चालविल्याने अपघात झाला. कंटेनर चालकावर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलिस करीत आहेत.
08446

