टाकळी भीमातील उसाच्या फडात आढळले बछडे
तळेगाव ढमढेरे, ता. २३ : टाकळी भीमा (ता. शिरूर) येथील बाळोबाचीवाडी येथे शेतात उसाची तोडणी सुरू असताना बिबट्याचे दोन बछडे आढळून आले आहेत. वनविभागाच्या वतीने या शेतातील दोन्ही बछड्यांना ताब्यात घेतले आहे.
बाळोबाचीवाडी येथील पृथ्वीराज वडघुले यांच्या शेतात उसाची तोडणी सुरू असताना कामगारांना उसाच्या फडात दोन बिबट्याचे बछडे दिसले त्यामुळे सर्व कामगार घाबरून गेले. बिबट्याच्या बछड्यांची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे व वनपरिमंडल अधिकारी गौरी हिंगणे यांना मिळताच नियतक्षेत्र वनअधिकारी प्रमोद पाटील, रेस्क्यू टीमचे सदस्य शेरखान शेख, गणेश टिळेकर, वैभव निकाळजे, शुभांगी टिळेकर यांनी या ठिकाणी पाहणी केली. या वेळी शेतकरी रवींद्र वडघुले, विक्रम मातने, बळीराम घुले, प्रशांत घोलप आदी उपस्थित होते. बिबट्याच्या बछड्यांना त्यांच्या आईच्या पुनर्मिलनासाठी शेतात सुरक्षित ठिकाणी ठेवले. टाकळी भीमा परिसरासह तळेगाव ढमढेरे, धानोरे, विठ्ठलवाडी, कासारी, निमगाव म्हाळुंगी, दहिवडी, पारोडी, करंजावणे, भांबर्डे आदी गावांच्या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असून आतापर्यंत अनेक पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ले केले आहेत. परिसराची पाहणी करून वन विभागाने योग्य त्या ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावावेत, अशी मागणी विविध गावांच्या सरपंच व पोलिस पाटलांनी केली आहे.
बिबट्याच्या दोन्ही बछड्यांना ताब्यात घेऊन उपस्थित शेतकरी व नागरिकांना बिबट्याविषयी मार्गदर्शन केले. परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात जाताना काळजी घ्यावी, रात्रीच्या वेळी शेतात फिरू नये, लहान मुलांना शेतात झोपवू नये, शेतात जाताना आवाज करावा, शेतात काम करताना मोठ्याने बोलावे.
- प्रमोद पाटील, नियतक्षेत्र वनअधिकारी
8492

