बिबट्याकडून वर्षभरात १३७९ पशुधनाचा फडशा

बिबट्याकडून वर्षभरात १३७९ पशुधनाचा फडशा

संजय बारहाते : सकाळ वृत्तसेवा
टाकळी हाजी, ता.१६ : शिरूर तालुक्यात वर्षभरात बिबट्याने तब्बल एक हजार ३७९ पशुधनांचा फडशा पाडला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या शासनाने एक कोटी ३० लाख ५८ हजार ३४३ रुपयांचे नुकसान भरपाई दिली आहे.

शिरूरमध्ये उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढल्याने बिबट्याला मुबलक पाणी, खाद्य व सुरक्षित निवारा मिळत आहे. त्यामुळे बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तालुक्यात घोड, कुकडी, भीमा, वेळ या चार नद्या तसेच चासकमान, डिंभे,घोड, मीना कालव्यासह थिटेवाडी, घोडधरण असल्यामुळे मोठ्या प्रमाणात क्षेत्र ओलीताखाली आले आहे.यामुळे प्रत्येक गावात उसाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. बिबट्या रात्रीची शिकार करून दिवसभर उसाच्या क्षेत्रात आराम करीत असतात. बिबट्याने वस्तीवरील शेकडो कुत्री फस्त केली आहेत. चोरांपासून सुरक्षेसाठी शेतकरी कुत्रे पाळतात मात्र आता बिबट्यापासून कुत्र्यांचीच सुरक्षा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

तालुक्यात बागायत पट्टा मोठ्या प्रमाणात असल्याने येथे स्थानिक व बाहेरूनही मेंढपाळ चाऱ्यांच्या शोधार्थ येत असतात. मात्र त्यांच्या मेंढयावरही बिबट्याचे मोठ्या प्रमाणात हल्ले केले आहेत.

शिरूर तालुक्यात ५२ गावातील चार हजार सहा हेक्टर क्षेत्रावर वनजमीन आहे. सन २०२३-२४ मधे तालुक्यात तीन मनुष्यावरील हल्याच्या घटना घटल्या. यामध्ये किरकोळ जखमा झाल्या होत्या. त्यांना औषध उपचारासाठी एक लाख २१ हजार रुपयांची मदत करण्यात आली. तसेच पशुधनावरील हल्लेही वाढले असून, गेली वर्षभरात १३७९ जनावरांनावर हल्ले करीत ठार केले आहे. त्यांना त्वरित मदत केली आहे.
- प्रताप जगताप, वनाधिकारी, शिरूर

तालुक्यात नवीन वनपरीक्षत्र कार्यालयाची गरज
शेतकऱ्याच्या जनावरांवरील हल्ले वाढत असून, दररोज ठिकठिकाणी बिबट्याचे दर्शन व हल्ल्यांच्या घटना घडत आहेत. तांदळी ते काठापूर, शिरूर ते केंदूर असा शिरूर तालुका १०० किमी सर्वदूर पसरला आहे. बिबट्याची संख्या वाढत गेली मात्र शिरूर मधे वन सेवक १७ असून, घटना घडल्यास तेथे पोचण्यासाठी त्यांनाही तारेवरची कसरत करावी लागत आहे. तालुक्याचे क्षेत्र मोठे असून, वनपरीक्षेत्र कार्यालय मात्र एकच आहे. तालुक्यात अजून एक वनपरीक्षेत्र कार्यालयाची गरज निर्माण झाली आहे.


पिंपरखेड येथे बिबट कॅम्प सुरू केला आहे. त्याप्रमाणे वडगाव रासाई -नागरगाव, कोरेगाव भीमा-वढू, येथे दोन बिबट कॅम्प सुरू करण्याची गरज आहे. यामध्ये ११ लोक कामाला असतात. स्थानिक तरुणांना रेस्कू करण्याचे ट्रेनिंग देऊन दिवस रात्रपाळीसाठी पेट्रोलिंग केले जाते.त्यामुळे नागरिकांना त्वरित मदत मिळते.
- प्रताप जगताप, वनपरीक्षेत्र अधिकारी,शिरूर


वन विभागाला काय हवीय मदत
सेवकांची संख्या वाढविण्याची गरज
सध्या दोन चारचाकी वाहने आहेत. मात्र ते कमी पडत असून अजून दोन वाहनांची आवश्यकता.
सव्वाशे गावे आहेत. मात्र पिंजरे २१. अजून १०० पिंजऱ्यांची गरज
बिबट्याच्या शोधासाठी ड्रोन कॅमेरे, ट्रॅप कॅमेरे यांची गरज


शिरूरमध्ये अंदाजे पाचशेच्यावर बिबट्यांची संख्या आहे. नवीन प्रजनन दररोज वाढतच आहे. यामुळे पशुधनांवरील हल्ला वाढत आहेत. जांबूत पिंपरखेड येथे मनुष्याचे बळी गेले आहेत. सरकारला मनुष्याच्या जिवापेक्षा बिबट्या महत्त्वाचा वाटतो. या प्रश्नावर गांभीर्याने निर्णय न घेतल्यास शेतकऱ्याला शेती करणे अवघड होईल
- राजेंद्र गावडे, माजी संचालक बाजार समिती शिरूर


00149

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com