दुधाचे दर घटल्याने उत्पादक पुन्हा संकटात

दुधाचे दर घटल्याने उत्पादक पुन्हा संकटात

टाकळी हाजी, ता. ३ : बाजार भाव प्रमाणे दुधाचे दर एक ते दोन रुपयांनी कमी केली आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. सध्या तालुक्यात पाण्याबरोबरच चाऱ्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. त्यातच पशुखाद्याचेही दर वाढले असून दुधाचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे या दोन्हींच्या खर्चाचा ताळमेळ घालताना दूध उत्पादकांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.

सध्या तीव्र उन्हामुळे दुधाच्या उत्पादनात वीस टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. पाणीटंचाई, चाऱ्याचा प्रश्न, पशुखाद्याचे वाढते दर, यामुळे दूध उत्पादक त्रस्त झालेला आहे. काही दिवसांपूर्वी अनेक दूध संघ व खासगी कंपन्यांनी एक ते दोन रुपयांनी दुधाचे दर कमी केले आहेत. त्यामुळे ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ असलेल्या गाईच्या दुधाचा प्रति लिटरला २९ रुपयांचा दर होता, आता पुन्हा २७ - २८ रुपयांवर आला आहे.

शिरूर तालुक्याला घोड, कुकडी, वेळ, मीना या चार नद्यांसह चार कालव्यांचे पाणी मिळत आहे. अनेक शेतकरी बागायती शेतीला जोड धंदा म्हणून दूध व्यवसायाकडे वळले आहे. यामधे तरुणाचे प्रमाण लक्षणीय आहे. तालुक्यात जिल्हा दूध संघाच्या शाखा असून खासगी पाच ते सहा दूध प्रक्रियेचे उद्योग आहे. तसेच गावोगावी संकलन केंद्र असून यामधून सुमारे तीन ते चार लाख लिटर दुधाचे संकलन केले जाते. त्यामधे हजारो तरुणांच्या हाताला काम मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत होत आहे. मात्र, याच व्यवसायाला सध्या घरघर लागली आहे.

उन्हाळ्यामुळे चाऱ्यांचे उत्पादनही घटले आहे. उसाची तोड बंद झाल्याने चाऱ्यासाठी वाढे मिळणे बंद झाले. मोठे गोठ्यावाले दूध उत्पादक ऊस व इतर चारा विकत घेत आहे. दूध वाढीसाठी जनावरांना भुसा, गोळी पेंड, सरकी, मका भरडा द्यावा लागतो. त्यांचेही भावात वाढ झाली आहे. तसेच दुभत्या जनावरांना वैद्यकीय उपचारांसाठीही मोठा खर्च करावा लागतो. दुधाचे दर कमी झाल्याने दुग्ध व्यवसायासाठी घेतलेले कर्जाचे हप्ते, भुशाचा खर्च यांचा ताळमेळ घालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

टाकळी हाजीच्या पश्चिम भागातून सुमारे एक लाख लिटर दूध वाड्यावस्त्यामधून व गावांमधील मोठ्या दूध संस्थेपर्यंत पोचविले जाते. बाजार भाव घटल्याने रोज लाखो रुपयांचा भुर्दंड दूध उत्पादकाला बसणार असल्याने चिंता वाढली आहे.

दूध पावडर व बटरला मागणी घटल्याने देशांतर्गत दुधाच्या दरावर परिणाम झाला आहे. केंद्र व राज्य सरकारने निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रक्रीया उद्योग व दूध उत्पादक अनुदान देण्याची गरज आहे. तरच हा व्यवसाय या जागतिक स्पर्धेत टिकून, दुधाला चांगला दर मिळेल.
- भैरवनाथ काळे, कार्यकारी संचालक, सुरुची दूध

शेती परवडत नाही, म्हणून दुधाचा धंदा निवडला. अनेक अल्प भूधारक शेतकऱ्यांचे मुले दूध व्यवसाय करतात. मात्र, दुधाचा दर सातत्याने कमी होतोय. त्यामुळे खर्चही भागत नाही. गाईच्या दुधाला ५० रुपये दर मिळाला पाहिजे.
- अतुल मुंजाळ ( दूधउत्पादक टाकळी हाजी )


खाद्याचे- भाव(५० किलो)
भुसा - १२५० रुपये,
गोळीपेंड - १६००,
सरकी - १७००,
मका भरडा - १२०० रुपये भाव आहे .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com