टाकळी हाजीत समाधान शिबिरात १७९ अर्जांवर कार्यवाही
टाकळी हाजी, ता. ५ : टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे आयोजन तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (ता. ४) करण्यात आले. या शिबिरात महसूल, कृषी, पंचायत समिती, आरोग्य, सेतू केंद्र, महिला व बालकल्याण यांसह विविध विभागांनी सहभाग घेतला.
प्रलंबित फेरफार, विविध योजना व सेवांबाबत, विविध समस्या निवारणासाठी नागरिकांनी अर्ज या सुविधेचा एकत्रित ठिकाणी उपयोग केला. एकूण २२४ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १७९ अर्जांवर कार्यवाही केली.
टाकळी हाजीचे मंडळ अधिकारी राजेंद्र पोटकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेतू केंद्राचे ४५, महसूल विभागाचे ३८ अर्ज निकाली निघाले. आरोग्य, पशुवैद्यकीय व महिला बालकल्याण विभागांचे सर्व अर्ज मंजूर केले. ग्रामीण भागात सर्वांत जास्त कळीचा मुद्दा ठरणाऱ्या भूमी अभिलेख, खात्यासह पाटबंधारे व सामाजिक वनीकरण विभागांचे एकही अर्ज प्राप्त झाला नाही.
टाकळी हाजीचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे यांनी नियोजन केले. या वेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, सरपंच अरुणा घोडे, उपसरपंच मोहन चोरे आदी उपस्थित होते.