झुलत्या पुलाची अखेर होणार तपासणी
टाकळी हाजी, ता. २४ : टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील रांजणखळग्यावरील झुलत्या पुलाची बांधकाम तपासणी करण्याचे आदेश एजन्सीला देण्यात आले आहेत.
‘सकाळ’ने याबाबत बातमी प्रसिद्ध करताच जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमरजीत रामसे यांनी तत्काळ तपासणी इंजिनिअर कंपनीला दूरध्वनी करून पुलाची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या.
मावळ येथे कुंडमळ्यात पूल कोसळण्याची घटना झाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने जगप्रसिद्ध असलेल्या रांजणखळग्यावरील झुलता पूल बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. गेली अडीच महिने हा पूल भाविक व पर्यटकांसाठी बंद होता. पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन्ही भागातून येणाऱ्या पर्यटकांना व भाविकांना पर्यटन करण्यासाठी हा पूल महत्त्वाचा आहे. पूल बंद केल्यामुळे अर्धा किलोमीटरचा वळसा पर्यटकांना यावे लागत होते. त्यामुळे भाविक व पर्यटकांमध्ये असंतोष व्यक्त केला जात होता. नवरात्रीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात पर्यटक व भाविकांची गर्दी आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने संबंधित ठेकेदार एजन्सीसह पाहणी करून पूल वापरण्यास योग्य असल्याचे पत्र आल्याने भाविक व पर्यटकांच्या सोईसाठी खुला केला आहे.
मात्र, ज्या तपासणीच्या कारणासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने अडीच महिने पूल बंद केला ती तपासणी कधी होणार? असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.
00670