बिबट्यांच्या दहशतीने गळ्यात खिळ्यांचे पट्टे
टाकळी हाजी, ता. १० : पिंपरखेड (ता. शिरूर) परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बिबट्यांच्या हल्ल्यांनी सर्वसामान्य जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यावर मात करण्यासाठी शेतकरी महिलांनी एक अनोखा उपाय शोधला आहे. त्या आता गळ्यात खिळ्यांचे पट्टे घालून शेतीत काम करत आहेत.
पिंपरखेड भागात बिबट्याने आतापर्यंत रोहन विलास बोंबे, शिवन्या शैलेश बोंबे व जांबूत येथील भागूबाई जाधव या तिघांचा जीव घेतला आहे. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या या हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचे सावट दाटले आहे. पालक मुलांना स्वतः शाळेत सोडत आहेत, तर शेतकऱ्यांना शेतात जाणेदेखील धोक्याचं बनलं आहे.
घोड नदीच्या काठावर असलेली सुपीक जमीन आणि दाट उसाची शेती. हेच आता बिबट्याचं लपण्याचे ठिकाण बनले आहे. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात उसाचे प्रचंड क्षेत्र असल्याने बिबट्याने परिसर सोडलेला नाही. या परिसरातील शेतकरी महिला आता बिबट्याच्या भीतीला सामोऱ्या जात आहेत. सुनीता संतोष ढोमे, उषा ज्ञानेश्वर ढोमे या महिलेने सर्वप्रथम गळ्यात खिळ्यांचा पट्टा घालण्याचा प्रयोग सुरू केला आणि त्यानंतर इतर महिलांनीही हा उपाय अवलंबला आहे.
...म्हणून पट्ट्याचा वापर
मूळतः हे पट्टे कुत्र्यांच्या सुरक्षेसाठी वापरले जातात. परंतु, आता बिबट्याच्या भीतीमुळे महिलांना स्वतःच हे पट्टे गळ्यात घालून शेतीत काम करावे लागत आहे. शेतात अनेक वेळा वाकून किंवा बसून काम करावे लागते. त्यामुळे बिबट्याचा हल्ला थेट गळ्यावर होण्याची शक्यता असते. पट्ट्याला असलेले खिळे बिबट्याच्या हल्ल्यात बचाव करतात. त्यामुळे महिलांना थोडेफार संरक्षण मिळू शकते. एवढी भयावह परिस्थिती या भागात निर्माण झाली आहे.
‘बिबटे वनतारात हलवा’
बिबट्याच्या सलग हल्ल्यांनंतर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केलं. पुणे- नाशिक महामार्ग आणि बेल्हे- जेजुरी मार्ग अडवून ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार शरद सोनवणे, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, माजी आमदार पोपटराव गावडे यांनी पीडित कुटुंबीयांना भेट देऊन सांत्वन केलं. रोहन बोंबे यांच्या घरी जाण्यासाठी रस्ता नव्हता; तो मार्गी लावण्याचं, तसेच रोहनच्या भावाचे पालकत्व स्वीकारण्याचे आश्वासन वळसे पाटील यांनी दिले आहे. मुलांना नोकरीचे आश्वासन आढळराव पाटील यांनी दिले आहे. मात्र, ग्रामस्थांचे एकच म्हणणे आहे की, जोपर्यंत बिबटे वनतारात हलवले जात नाहीत, तोपर्यंत आम्हाला शांततेची झोप लागणार नाही.’’
फोटो : शेतकरी महिला सुनीता ढोमे, उषा ढोमे बिबट्यापासून संरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचा पट्टा घालून शेतीत काम करताना.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

