टाकळीत येथील बंधाऱ्यातून गळती
टाकळी हाजी, ता. २३ : टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील घोड नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. या गळतीमुळे बंधाऱ्यात साठवलेले पाणी झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
टाकळी हाजी व परिसरातील शेती मोठ्या प्रमाणावर घोड नदीवरील पाण्यावर अवलंबून आहे. सध्या कांदा, गहू, भाजीपाला तसेच इतर रब्बी पिके अंतिम टप्प्यात असून, त्यांना पाण्याची मोठी गरज आहे. मात्र, बंधाऱ्यातून सुरू असलेल्या गळतीमुळे पाण्याची पातळी सातत्याने घटत आहे. वेळेत दुरुस्ती न झाल्यास शेतकऱ्यांना पिकांसाठी पुरेसे पाणी मिळणे कठीण होणार असून, उत्पादनावर परिणाम होऊन आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे.
स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. बंधाऱ्याच्या भिंतींना तडे गेले असून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे मौल्यवान पाणी वाया जात असून उन्हाळ्यातील पाणी नियोजन धोक्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने तातडीने बंधाऱ्याची पाहणी करून गळती थांबवण्यासाठी दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी होत आहे. पर्यायी पाणी व्यवस्थापन व पाण्याचा काटकसरीने वापर याबाबतही योग्य नियोजन करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर (कुकडी पाटबंधारे विभाग, नारायणगाव) तसेच डी. एस. कोकणे (उपविभागीय अधिकारी, कुकडी पाटबंधारे उपविभाग क्र. ३, मंचर) यांच्याशी संपर्क साधला असता सदर बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. कुकडी कालवा सल्लागार समिती सदस्य प्रकाश वायसे यांनीही याप्रकरणी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
या बंधाऱ्यावर शेकडो उपसा सिंचन योजना कार्यान्वित आहेत. गळतीमुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार असून, उन्हाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे, असे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र गावडे यांनी सांगितले.
00847

