फाकटे-चांडोह परिसरात दोन मादी बिबट जेरबंद
टाकळी हाजी, ता. २९ : शिरूर तालुक्यातील फाकटे व चांडोह परिसरात दोन मादी बिबट जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
याबाबत शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे म्हणाले, चांडोह येथील भाऊ पानमंद यांच्या शेतामध्ये सुमारे चार वर्षे वयाची मादी बिबट जेरबंद करण्यात आली. तसेच फाकटे येथील पोपट फिरोदिया यांच्या शेतात सुमारे सहा वर्षे वयाची दुसरी मादी बिबट जेरबंद करण्यात आली आहे.
दरम्यान, पिंपरखेड परिसरात आतापर्यंत एकूण २९ बिबटे जेरबंद करण्यात आल्याची माहिती वनरक्षक लहू केसकर यांनी दिली. जेरबंद करण्यात आलेल्या दोन्ही बिबट्यांना जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात हलविण्यात आले आहे.
सध्या ऊसतोड मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने बिबटे त्यांच्या नैसर्गिक अधिवासातून बाहेर पडत असल्याचे चित्र आहे. मात्र वन विभागाकडून तत्काळ जेरबंद कारवाई करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे.
दरम्यान, टाकळी हाजी परिसरात अजूनही काही ठिकाणी बिबट दिसत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली असून, त्या भागातही पिंजरे लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

