थेऊरला द्वारयात्रेची सांगता

थेऊरला द्वारयात्रेची सांगता

Published on

थेऊर, ता. २८ : गणेश चतुर्थीनिमित्त थेऊर (ता. हवेली) येथील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून गर्दी झाली होती. बुधवारी (ता. २७) पहाटे ५ वाजता मंदिर उघडल्यानंतर अजय आगलावे यांनी श्रींचा अभिषेक आणि महापूजा केली. नंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. भाद्रपद गणेश द्वारयात्रा निमित्ताने दुपारी ३.३० वाजता थेऊर ग्रामस्थ आणि आगलावे बंधू यांनी श्रींची पालखी काढली. ती ग्रामदैवत म्हातारीआई मंदिरात पोहोचली. नंतर तेथे पिरंगुटकरांनी पदे गायली. ग्रामप्रदक्षिणा करून पालखी परत चिंतामणी मंदिरात पोहोचली. रात्री १० वाजण्याच्या सुमारास देवाची पूजा झाली. त्यानंतर श्री चिंतामणीस महापोषाख चढविण्यात आला. त्यानंतर पालखी काढण्यात आली. यावेळी गुलालाची उधळण करीत टिपऱ्या खेळल्या. रात्रभर पदांचे गायन झाले, सकाळी देवाची दृष्ट काढण्यात आली आणि मटकी प्रसादाने ४ दिवसांच्या उपवासाची सांगता करण्यात आली.
परंपरेनुसार भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून द्वारयात्रा काढली होती. यामध्ये सद्‌गुरू मोरया गोसावी महाराज यांच्या पूजेतील मूर्ती घेऊन पिरंगुटकर देव मंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते. यातील पहिल्या दिवशी कोरेगाव मूळ येथील आसराई देवी, दुसऱ्या दिवशी आळंदी म्हातोबाची येथील ओझराई माता, तिसऱ्या दिवशी मांजरी येथील मांजराई माता येथे अनवाणी जाऊन आमंत्रण दिले. तर चौथ्या दिवशी थेऊर येथील म्हातारी आयेथे जाऊन आमंत्रण देत द्वारयात्रा झाली.
बुधवारी (ता. २७) ‘चिंतामणी’ला अभिषेक आणि महापूजा झाली. परंपरेप्रमाणे ‘चिंतामणी’ला छत्तीस भोगांचा नैवेद्य दाखविण्यात आला. श्री मोरया गोसावी यांनी रचलेली पदे गाऊन चिंतामणीचा उत्सव साजरा केला. यावेळी चिंचवड देवस्थानचे विश्‍वस्त केशव विध्वंस उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com