उरुळी कांचनला होणार सुसज्ज अग्निशमन केंद्र
थेऊर, ता. २८ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) दौंड, पुरंदर व पूर्व हवेलीसाठी उरुळी कांचन (ता. हवेली) येथे स्वतंत्र अग्निशमन केंद्र मंजूर केले असून, याचा फायदा या तीन तालुक्यातील जनतेला होणार आहे. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील कांचन सिटी येथे दोन एकर जागेत हे केंद्र उभारण्यात येणार असून, यासाठी पीएमआरडीएने अग्निशमन केंद्र बांधणीसाठी तब्बल ११ कोटी ४ लाख २९ हजार ७६० रुपयांचा निधीही वर्ग केला असल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य व यशवंत कारखान्याचे संचालक संतोष कांचन यांनी दिली आहे.
पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे व अग्निशमन विभागाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी बुधवारी (ता. २६) नव्याने होणाऱ्या अग्निशमन केंद्रासाठी निधी वर्ग झाल्याने लवकरच या कामाची निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती दिली. संतोष कांचन यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागील अनेक वर्षांपासून वारंवार पाठपुरावा सुरू ठेवला होता. आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडेही त्यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. त्यामुळे पूर्व हवेलीसह परिसरातील नागरिकांकडून तसेच, व्यापारी वर्गाकडून कांचन यांचे कौतुक होत आहे.
दरम्यान, पुणे- सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, थेऊर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, उरुळी कांचन या भागात झालेल्या औद्योगिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत आहे. या ठिकाणी मोठमोठ्या कंपन्या, शैक्षणिक संकुले, बाजारपेठा व अनेक प्रकारचे व्यवसाय विकसित होत आहेत. यासाठी अग्निशमन केंद्र गरजेचे होते. या ठिकाणी लवकरच स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहे.
दुर्घटनांवर मिळणार तातडीने मदत
नव्याने होणाऱ्या अग्निशमन केंद्रामुळे दौंड, पुरंदर व पूर्व हवेलीसह परिसरात होणाऱ्या दुर्घटनांवर तातडीने उपाययोजना उपलब्ध होणार आहे. पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, उरुळी कांचन अशा मोठ्या व झपाट्याने विकसित होणाऱ्या गावात वारंवार आगीच्या घटना घडतात. यासाठी स्वतःची अग्निशमन यंत्रणा असणे आवश्यक होती. बऱ्याचदा लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी वाघोली व हडपसर पालिकेचा बंब बोलवावा लागत होता. बंब येईपर्यंत संबंधित दुकानदार मालकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोर जावे लागत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.