लोणी काळभोरमध्ये अवैध धंदेचालकाची मुजोरी

लोणी काळभोरमध्ये अवैध धंदेचालकाची मुजोरी

Published on

थेऊर,ता.७ : मोबाइलच्या व्हॉट्सॲप स्टेटस् विरोधात ठेवल्याचा राग मनात धरून अवैध धंदेचालकाने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने महिलेसह तिघांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील सिद्राम मळा परिसरात असलेल्या म्हस्कोबा मंदिर समोरील रस्त्यावर शुक्रवारी (ता.५) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली आहे. या मारहाणीत एक जण जखमी झाला आहे तर तीन जणांच्या विरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश बाळू बागडे (वय २०), कल्पना बाळू बागडे, योगेश नागनाथ कांबळे या तिघांना मारहाण झाली आहे. तर शंकर तानाजी धायगुडे (वय २८), नागेश चंद्रकांत वाघमारे (वय २८), अक्षय गहिनीनाथ मस्तूद (वय २९, सर्व रा.सिद्राममळा, लोणी काळभोर, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पुढील तपास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश बोराटे करीत आहेत.

शंकर धायगुडेवर अनेक गुन्हे दाखल
शंकर धायगुडे हा अवैध धंदेचालक म्हणून कुप्रसिद्ध आहे.त्याच्यावर याअगोदरही लोणी काळभोर पोलिस ठाण्यात शासकीय कर्मचाऱ्याला कर्तव्य बजावताना अडथळा निर्माण करणे, दंगल घडवून आणण्याच्या प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमवणे, आत्महत्येचा प्रयत्न करणे असे विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. धायगुडेने आताही महिलेसह तिघांना शिवीगाळ करून मारहाण केली आहे. त्यामुळे या अवैध धंदेचालकाची मुजोरी कधी थांबणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com