थेऊरला नदीत आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
थेऊर, ता. १३ : थेऊर (ता. हवेली) येथील पॉवर हाउसजवळ असलेल्या नदीपात्रात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह शुक्रवारी (ता. १२) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आढळला.
काही नागरिकांना थेऊर येथील नदीपात्रात एक व्यक्ती निपचित अवस्थेत पडलेला आढळून आला. नागरिकांनी या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली. पोलिस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, योगेश पैठणे, पोलिस हवालदार तेजस जगदाळे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या अनोळखी व्यक्तीला उपचारासाठी लोणी काळभोर येथील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू उपचारापूर्वीच झाल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांना मृतदेहाच्या अंगावर कोणतीही ताजी जखम आढळून आलेली नाही. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण पुढे येईल.
या मृत्यू झालेल्या अनोळखी व्यक्तीचे वय ३० ते ३५ असून, उंची १६५ से.मी. आहे. शरीर बांधा मध्यम, उजव्या हाताच्या पोटरीवर ‘जय बजरंग’ लिहिले आहे. या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास लोणी काळभोर पोलिस ठाण्याशी ०२०-२९९९५२६० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी केले.