थेऊर येथील ‘यशवंत सहकारी’ची २८ ला वार्षिक सर्वसाधारण सभा
थेऊर, ता.१७ : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची रविवारी (ता. २८) ४२ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे.
शासनाने जमीन विक्री व्यवहाराला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिल्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या सभेकडे तालुक्यासह राज्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे, अशी माहिती कार्यकारी संचालक कैलास जरे यांनी दिली.
कोलवडी-मांजरी खुर्द रस्त्यावरील लक्ष्मी गार्डन येथे सकाळी अकरा वाजता सभा होणार आहे. यावेळी सभेत २६ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या अधिमंडळाचे वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे, सन २०२४-२०२५ या वर्षाचा संचालक मंडळानी सादर केलेला वार्षिक अहवाल, ताळेबंद व नफा-तोटा पत्रके स्वीकारणे व त्यांची नोंद घेणे. सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षाकरिता संचालक मंडळाने तयार केलेल्या भांडवली व महसुली अंदाजपत्रकाची नोंद घेण्यात येणार आहे. मात्र, या विषय पत्रिकेत शासनाने जमीन विक्री व्यवहाराला मंत्रिमंडळ बैठकीत न्यायालयीन प्रक्रियेला अधीन राहून व कृषी उत्पन्न बाजार समितीला फक्त उपबाजार सुरू करण्यासाठीच या जागेचा वापर करावा लागेल,ती जागा बाजार समितीला कोणालाही विकता येणार नाही, अशा अटी टाकून मंजुरी दिलेल्या विषयाचा उल्लेख नाही त्यामुळे न्यायालयात गेलेल्या मंडळींच्या याबाबतच्या प्रश्नांच्या सरबत्तीला संचालक मंडळाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.