

उरुळी कांचन, ता. ६ : पैशांच्या कारणावरून दोन गटांत शिवीगाळ, दमदाटी करीत कोयत्याने वार केल्याची घटना नायगाव-पेठ-वडाचीवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत बुधवारी (ता. ५) घडली. याप्रकरणी दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, दोन्ही गटांतील सात जणांवर उरुळी कांचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या घटनेत मनीषा संपत चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार स्वप्नील शिवाजी चौधरी (रा. नायगाव पेठ, वडाचीवाडी, ता. हवेली), हितेश कांचन, दीपक धनकुडे (दोघे रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, तर दुसऱ्या घटनेत स्वप्नील शिवाजी चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संपत तुकाराम चौधरी, मनीषा संपत चौधरी, यश संपत चौधरी व सोहम संपत चौधरी (सर्व रा. वडाचीवाडी पेठ, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा चौधरी या वडाचीवाडी येथे राहतात. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास स्वप्नील चौधरी यांच्या गुरांच्या गोठ्याजवळ त्यांचा मुलगा यश याला स्वप्नील चौधरी, हितेश कांचन व दीपक धनकुडे यांनी शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, हातातील दगड फेकून मारून डोक्यात व अंगावर दुखापत केली होती. ही भांडणे सोडविण्यासाठी मनीषा चौधरी गेल्या असता, वरील तिघांनी हातातील दगड फेकून मारले. त्यानंतर यश व मनीषा चौधरी घरी निघून आले होते. नंतर यश हा दुसऱ्या घरी गेला असता, स्वप्नील चौधरी याने जबरदस्तीने घरात घुसून शिवीगाळ, दमदाटी करत दगडफेक केली. तसेच मनीषा चौधरी यांना मारहाण करून नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दुसऱ्या घटनेत स्वप्नील चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वडाचीवाडी पेठ (ता. हवेली) गावाच्या हद्दीत गोठ्यावर घेतलेल्या उसाचे पैसे देण्याच्या कारणावरून संपत चौधरी, मनीषा चौधरी, यश चौधरी, सोहम चौधरी यांनी शिवीगाळ केली. तसेच संपत चौधरी व यश चौधरी यांनी कोयत्याने तोंडावर, तसेच डोक्यात वार करून, मनीषा चौधरी हिने डोळ्यात मसाला टाकून शिवीगाळ, दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, दोन्ही प्रकरणांचा तपास सहाय्यक फौजदार सस्ते हे करीत आहेत. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.