तळेगाव-चाकण महामार्गाची चिखलामुळे ‘फसगत’
गणेश बोरुडे : सकाळ वृत्तसेवा
तळेगाव स्टेशन, ता. ३० : तळेगाव-चाकण महामार्गावर सध्या सर्वत्र चिखल पसरत आहे. आधीच अपघातप्रवण म्हणून चर्चेत असलेल्या या रस्त्यावर चिखलामुळे वाहनचालकांची फसगत होत आहे. परिणामी, हा रस्ता छोट्या-मोठ्या वाहनांसाठी आणखी धोकादायक झाला आहे. इंदोरी ते खालुंब्रेदरम्यान रिंगरोडचे काम सुरू आहे. तर, इंदोरी ते देहूफाटा मार्गावर पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे जलवाहिनीचे काम सुरू आहे. या खोदकामामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.
जलवाहिनीसाठी इंदोरी ते येलवाडी हद्दीत देहू फाट्यादरम्यान रस्त्याकडेला अगदी एक दोन फूट अंतरावर समांतर खोदकाम सुरू आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कंत्राटदाराने खोदाईनंतर साइडपट्ट्यांची पुरेशी डागडुजी आणि मुरुम टाकून पक्की दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे तोलानी ते इंदोरी गावादरम्यान रस्त्यालगत खड्डे आणि डबकी तयार झाली आहेत. तसेच पोकलेनच्या चैन घासल्याने डांबरी रस्ताही खराब झाला आहे.
दुसरीकडे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोडच्या उड्डाणपुलाचे खांब उभारण्यासाठी भंडारा डोंगर पायथ्यालगत दक्षिणेला सांगुर्डी हद्दीत, उत्तरेला सुदवडी ग्रामपंचायत हद्दीत काळभोर पेट्रोल पंपाशेजारी तसेच सुदुंब्रे फाटा ते खालुंब्रेदरम्यान दोन ठिकाणी दुतर्फा मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू आहे. तेथील पोकलेन, बोरिंग मशीन, क्रेन्स, डंपर रस्त्यावर येताना चाकांना लागलेला चिखल महामार्गावर पसरतो. त्यामुळे रस्ता निसरडा होऊन दुचाकी आणि छोटी चारचाकी वाहने त्यावरुन घसरतात. रस्त्याकडेला पार्क केलेले कार ट्रेलर आणि इतर अवजड वाहनांमुळेही रस्त्यावर चिखल रस्त्यावर पसरतो. त्यात पाऊस सुरू असल्यास वाहने घसरतात. या संदर्भात एमएसआरडीसी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कंत्रादारांकडून गांभीर्यपूर्वक उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत.
नागरिकांच्या तक्रारी
- खोदकाम सुरू असल्याने पावसामुळे चिखल झाला आहे. त्यात जड, अवजड वाहने फसून कलंडत आहेत.
- फसलेली वाहने क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यासाठी वेळ आणि पैशांचा अपव्यय होत आहे.
- मोठी वाहने शेजारुन भरधाव जाताना अंगावर चिखल उडतो
- पाऊस थांबल्यानंतर कोरडा झालेल्या रस्त्यावर प्रचंड धूळ
- धुळीमुळे दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना त्रास
- छोटी चारचाकी वाहने आणि दुचाकीस्वारांच्या जिवाला धोका
वाहनधारकांची अपेक्षा
- रस्त्यावर चिखल पसरल्यास वेळोवेळी स्वच्छता करावी
- रस्ता सुरक्षिततेबाबत खबरदारी घेण्याबाबतचे आदेश संबंधित बेफिकीर कंत्राटदारांना द्यावेत
- एमएसआरडीसी, पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन, तळेगाव दाभाडे वाहतूक विभागाने रस्ता सुरक्षेकडे लक्ष द्यावे
वाहतूक विभागाचा दावा...
‘‘रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत. पाऊस थांबेपर्यंत तळेगाव-चाकण मार्गालगतचे काम बंद ठेवण्याबाबत जलवाहिनी कामावरील कंत्रादाराला सूचना दिल्या आहेत,’’ असे तळेगाव दाभाडे वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
महापालिकेच्या भामा-आसखेड जलवाहिनीचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आहे. कंत्राटदारास रस्ता सुरक्षिततेबाबत खबरदारी घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
- दीपक पाटील, कार्यकारी अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका
रिंगरोडच्या कामाच्या परिसरातील रस्ता सुरक्षेसंदर्भात योग्य ती काळजी घेण्याबाबत संबंधित कंत्रादारांना सूचना देत आहोत.
- अशोक भालकर, मुख्य अभियंता, एमएसआरडीसी
तळेगाव-चाकण मार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच आहे. रस्त्याकडेने चालणे कठीण; तेवढेच जीवघेणे ठरते आहे. जलवाहिनी आणि रिंगरोडच्या कामांमुळे रस्त्यावर वारंवार चिखल पसरतो आहे. कंत्राटदार आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होते आहे.
- संजय चव्हाण, सदस्य, तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग कृती समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.