
डुंबरवाडी येथे शैक्षणिक साहित्य प्रदर्शन
ओतूर, ता. २७ : ओतूर (ता. जुन्नर) येथील श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे विलास तांबे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, डुंबरवाडी येथे राष्ट्रीय विज्ञान दिन व मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून छात्राध्यापकांच्या कलागुणांना व कौशल्यांना वाव मिळावा यासाठी शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीहरी तांबे व सचिव वैभव तांबे, प्राचार्य डॉ. गोविंद खरात, डॉ. रमेश काकडे उपस्थित होते.
सदर उपक्रमामध्ये महाविद्यालयातून विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन विविध विषयांवर आधारित नावीन्यपूर्ण तक्ते, मॉडेल्स व भित्तिपत्रके तयार केली व त्यांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना त्यांच्या कलागुणांना वाव देणे व भविष्यासाठी उत्तम शिक्षक घडवणे यासाठी अशा स्वरूपाच्या उपक्रमांचे आयोजन उपयुक्त व फायदेशीर ठरते असे मत श्रीहरी तांबे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. स्नेहल वायकोस, प्रा. उमा काळे, प्रा. सारिका शेटे, प्रा. मीनाक्षी पालीवाल, प्रा. प्रियंका कडाळे, नीलेश बटवाल यांनी मोलाची भूमिका पार पाडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसुदेव राऊत यांनी तर, आभार प्रा. रामदास कदम यांनी मानले.