
कॅप्सूल पेटंट प्राप्तीबद्दल सुप्रिया आहिनवे हिचा गौरव
ओतूर, ता. १८ ः उदापूर (ता. जुन्नर) येथील ग्रामविकास मंडळ ओतूर संचलित सरस्वती विद्यालयातील माजी विद्यार्थी सुप्रिया आत्माराम आहिनवे हिने एकाच कॅप्सूलमध्ये तीन प्रकारची औषधे भरण्याचा नवीन शोध लावला, तसेच त्या शोधास भारत सरकारने तिला पेटंट दिल्याबद्दल विद्यालय व उदापूर ग्रामस्थांकडून तिचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्याविकास मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे हे होते, तर श्रीराम देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष पांडुरंग शिंदे, ओतूर ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अनिल तांबे, उदापूर ग्रामविकास मंडळ अध्यक्ष बबन कुलवडे, सरपंच सचिन आंबडेकर, उपसरपंच जयश्री अमूप, पराग जगताप, डॉ. पुष्पलता शिंदे, सावळेराम आरोटे, बी. एम. शिंदे, भागूजी कुलवडे, रघुनाथ तांबे, राजेंद्र डुंबरे, आत्माराम अहिनवे, अशोक अहिनवे, बाजीराव शिंदे, मुख्याध्यापक शिवाजी अस्वार आदी उपस्थित होते.
यावेळी सुप्रिया आहिनवे यांनी त्यांच्या संशोधनाबद्दल माहिती देताना सांगितले की, १९३० मध्ये रॉबर्ट पॉल शेरर यांनी कॅप्सूल बनविणारी मशिन तयार केली होती. जवळपास ९३ वर्षांपासून त्यात कोणताही बदल झाला नव्हता. त्या मशिनमध्ये बदल घडवून एकाच कॅप्सूलमध्ये तीन प्रकारची औषधे भरणे आता शक्य होणार आहे. विद्यार्थ्यांना जर जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित केले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
प्रभाकर शिंदे म्हणाले की, सरस्वती विद्यालयात सुप्रियाचे शालेय शिक्षण पूर्ण झाले असल्याचा आम्हाला अभिमान आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी जिद्द, चिकाटी, मेहनत घेण्याची ताकद जर असेल तर कशीही परिस्थिती असली तरीही विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यावाचून कोणीही रोखू शकत नाही, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. सर्व विद्यार्थ्यांनी सुप्रियाचा आदर्श समोर ठेवून जीवनात यशाची शिखरे गाठावी.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कांबळे यांनी केले, तर आभार शिक्षक प्रतिनिधी योगेश गाढवे यांनी मानले.
--------