इंदापुरात राष्ट्रवादीला भावनिक लाटेचा फायदा
उद्धट, ता. ११ : इंदापूर तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक वातावरणाचा या निवडणुकीवर मोठा प्रभाव पडल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या भावनेतून मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला भरघोस पाठिंबा दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले.
या निवडणुकीपूर्वी तालुक्यातील पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी दत्तात्रेय भरणे आणि हर्षवर्धन पाटील एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमध्ये व मतदारांमध्ये सुरुवातीला नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र ही नाराजी भांडवलात रूपांतरित करण्यात भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. उलट निवडणुका जवळ येत गेल्या तसतसे राजकीय समीकरणे बदलत गेली आणि वातावरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने झुकत गेले. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भावनिक लाट अधिक तीव्र झाली. गावोगावी दादांच्या आठवणी जागवल्या जात होत्या. त्यांच्या कार्याचा उल्लेख करून मतदारांशी संपर्क साधला गेला. परिणामी अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, भारतीय जनता पक्षातील स्थानिक नेतृत्वाला कार्यकर्त्यांतील नाराजीचा योग्य वापर करता आला नाही. काही ठिकाणी समन्वयाचा अभाव आणि प्रचारातील मर्यादा यामुळे पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. उलट या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससाठी पूरक वातावरण निर्माण होऊन विरोधकांनी स्वतःचेच नुकसान करून घेतल्याची भावना राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत. एकूणच, इंदापूर तालुक्यातील या निवडणुकीत भावनिक वातावरण, स्थानिक राजकीय समीकरणे आणि संघटनात्मक ताकद यांचा परिणाम दिसून आला. राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा आपले मजबूत अस्तित्व दाखवून दिले असून आगामी राजकीय घडामोडींमध्ये या निकालाचा प्रभाव जाणवणार असल्याचे मानले जात आहे.
दादा नसल्याची जाणीव चटका लावणारी
जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला भरभरून साथ देत स्पष्ट बहुमत दिले, पण या विजयाच्या क्षणी ‘दादा’ नसल्याची जाणीव प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेली. विजय मिळाला, पण आनंदातही एक हुरहूर दाटून आली. नेहमीप्रमाणे जल्लोष, गुलाल, ढोल-ताशांचा गजर नव्हता. त्याऐवजी शांतपणे, डोळ्यांत पाणी आणि मनात आठवणी घेऊन कार्यकर्त्यांनी दादांना अभिवादन केले. ‘हा विजय दादांचाच आहे,’ अशी भावना सर्वत्र उमटली. दादांनी घडवलेल्या संघटनेच्या बळावर राष्ट्रवादीने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले, मात्र या यशाचा आनंद त्यांच्या उपस्थितीत साजरा करता आला नाही, हीच खंत कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

