
‘अटल भूजल’मध्ये लोकसहभाग महत्त्वाचा राज्याचे भूजल सर्वेक्षण आयुक्त चिंतामणी जोशी यांचे मोढवे येथे प्रतिपादन
उंडवडी, ता. ३ : ‘‘केंद्र सरकार व जागतिक बॅंकेच्या सहकार्याने राज्यातील १३ जिल्ह्यांतील १४३३ गावांत अटल भूजल योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत संबंधित गावांत ग्रामपंचायतस्तरीय प्रशिक्षण देण्यात येत आहे. योजनेसाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. येत्या काळात पडणाऱ्या पावसाचा थेंब अन् थेंब जमिनीत जिरविण्यासाठी गावागावांत लोकसहभागातून प्रयत्न होणे गरजेचे आहे,’’ असे आवाहन राज्याचे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आयुक्त चिंतामणी जोशी यांनी मोढवे (ता. बारामती) येथे केले.
येथे भूजल सर्वेक्षण विभाग व सिमॅसेस लर्निंग एलएलपी या संस्थेच्या वतीने ग्रामपंचायतस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ आयुक्त चिंतामणी जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जोशी बोलत होते.
या प्रसंगी उपसंचालक डॉ. प्रमोद रेड्डी, वरिष्ठ भू वैज्ञानिक संतोष गावडे, सहायक भूवैज्ञानिक सुजाता सावळे, राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी विनायक गारडे, शुभांगी काळे, जीवन विकास संस्थेचे दीपक कुलकर्णी, सिमॅसेस लर्निंगचे अंकित माहेश्वरी, सरपंच शीतल मोरे, उपसरपंच राजेंद्र मोरे, ग्रामसेविका मीरा होले, पोलिस पाटील रजनी मोरे आदी उपस्थित होते.
वैभव मोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार मानले. कार्यक्रमानंतर आयुक्त जोशी यांनी मोढवे व मुर्टी गावाला भेट देवून गावात बोअरवेल घेवून पाण्याची पातळी मोजण्यासाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडून बसविण्यात आलेल्या पिझोमीटर या उपकरणाची पाहणी केली.