उंडवडी सुपे परिसरात लंपीचा प्रादुर्भाव
उंडवडी, ता. १६ : उंडवडी सुपे (ता. बारामती) परिसरात जनावरांमध्ये लंपी स्किन डिसीज या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. गायी व बैलांमध्ये ताप, अंगावर गाठी, डोळे व नाकातून स्त्राव, सूज, आणि भूक मंदावणे अशी लक्षणे दिसून येत आहेत. या आजारामुळे दूध उत्पादनात घट होत आहे. त्यामुळे पशुपालक शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे.
उंडवडी सुपे येथील पशुवैद्यकीय उपकेंद्राअंतर्गत सहा गावांचा समावेश आहे. यापैकी सोनवडी सुपे व उंडवडी कडेपठार या दोन गावात लंपीने पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या वर्षी उंडवडी कडेपठार, जराडवाडी व उंडवडी सुपे या गावात काही जनावरांना हा आजार आढळून आला होता. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाने जनावरांना प्रतिबंधक लसीकरण व उपाययोजना राबविल्याने परिसर लंपी आजार मुक्त झाला होता.
पशुवैद्यकीय विभागाच्या माहितीनुसार, लंपी हा आजार, प्रामुख्याने डास, माशा, गोचीड यांच्या माध्यमातून पसरतो. उंडवडीसह आसपासच्या काही गावांमध्ये बाधित जनावरे आढळून येत असल्याने गावपातळीवर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. उंडवडी सुपे, उंडवडी कडेपठार, जराडवाडी, खराडेवाडी, सोनवडी सुपे, कारखेल या सहा गावातील ५ हजार २०० जनावरांना लंपी प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पशुधन हे उपजीविकेचा कणा आहेत. लंपी आजारामुळे मोठे नुकसान होण्याची भीती आहे, त्यामुळे सरकारने जनावरांना वेळेत औषधे, लस आणि आर्थिक मदत पुरवावी.
- सुलोचना मोरे, सोनवडी सुपे
बाधित जनावरांना तातडीने उपचार देणे गरजेचे आहे. लंपी आजार झालेल्या जनावरांना विश्रांती गरज असते. त्यांना स्वच्छ पाणी व पौष्टिक आहार देणेही महत्त्वाचे आहे. डांसाचे निर्मुलन करण्यासाठी सायंकाळी गोठ्यात फवारणी व धुराळनी करून घ्यावी. आजूबाजूला स्वच्छता राहील, याची शेतक-यांनी काळजी घ्यावी तसेच पशुपालकांनी जनावरांच्या आरोग्याची नियमित तपासणी करावी, अंगावर गाठी, सूज किंवा ताप आढळल्यास त्वरित नोंद द्यावी, आणि लसीकरण करून घ्यावे.
- डॉ. महेंद्र सरोदे, पशुधन पर्यवेक्षक, उंडवडी सुपे
02901