बहुगुणी करडई नामशेष होण्याच्या मार्गावर
उंडवडी, ता. १: बारामती तालुक्यातील जिरायती भागात रब्बी हंगामात ज्वारीसोबत करडईची लागवड परंपरेने होत असे. मात्र, सध्या मजूर टंचाई, बाजारभावाचा अभाव आणि बदलत्या शेती पद्धतीमुळे हे बहुगुणी पीक नामशेष होण्याच्या मार्गावर आले आहे.
उंडवडी सुपे, कारखेल, देऊळगाव रसाळ, खराडेवाडी, सोनवडी सुपे, जराडवाडी, गोजुबावी, जळगाव सुपे, जळगाव कडेपठार, अंजनगाव, कऱ्हावागज, बऱ्हाणपूर, साबळेवाडी आदी गावांत एकेकाळी करडईची लागवड मोठ्या प्रमाणावर होत असे. काही शेतकरी करडईला मुख्य पीक म्हणूनही घेत होते. परंतु गेल्या दहा–पंधरा वर्षांत करडईची लागवड जवळपास बंद झाली आहे.
करडईचे पीक ज्वारीसोबत घेतल्यास किडरोगाचे प्रमाण कमी होते. परंतु करडई न घेतल्याने आज ज्वारीवरील किडरोग वाढले आहेत. करडईची भाजी आणि शुद्ध तेल बाजारातूनही गायब होऊ लागले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पारंपरिक आरोग्यदायी आहार हरवला आहे. यामुळे आता ‘करडई पिकवा-किडरोग नियंत्रण करा, ताजी भाजी खा आणि शुद्ध तेल मिळवा’ अशी वेळ आता आली आहे.
दृष्टिक्षेपात करडई
१. करडईची भाजी गुणकारी, शुद्ध तेल हृदयासाठी हितकारक
२. बदलत्या जीवनशैलीत पिकाचे महत्त्व वाढले
३.शेतकऱ्यांचे दुर्लक्ष, कमी बाजारभावामुळे पुनरुज्जीवन गरजेचे.
४. रब्बी हंगामात पेरणीचा कालावधी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर
५. शेतकऱ्यांनी पिकाच्या लागवडीकडे वळणे गरजेचे
कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्राने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना करडई लागवडीबाबत मार्गदर्शन करावे, मूल्यवर्धनासाठी प्रक्रिया केंद्र उभारावीत आणि शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, तसेच या पिकाला सरकारकडून अनुदान देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
पूर्वी आम्ही ज्वारीसोबत करडई घेत होतो. भाजी खायचो, तेल गाळायचो. पण आता मजूर मिळत नाहीत आणि बाजारभावही नाही. म्हणून करडईची शेती थांबवली आहे.
- बाळासाहेब जराड, जराडवाडी, शेतकरी
करडईचे नवीन वाण विकसित झाले आहेत. पीबीएनएस - ८६ व पीबीएनएस- १२ तसेच एसएस - ७०८ या वाणातून जिरायतीला ५ ते ८ क्विंटल व बागायतीला १० ते १२ क्विंटल एकरी उत्पन्न मिळते. ज्वारीमध्ये ४ ओळीनंतर २ ओळी करडई पेरणी करता येते. करडईमुळे ज्वारीवरील मावा कीड, चिकटा हा रोग नियंत्रणात राहतो. सद्या करडईला साडे चार ते पाच हजार रुपये क्विंटलला बाजार मिळत आहे. तसेच करडई गव्हाच्या हार्वेस्टिंग मशिनद्वारे करता येते. त्यामुळे मजूरही लागत नाहीत."
- संतोष करंजे, विशेषज्ञ, बारामती कृषी विज्ञान केंद्र
45585, 45589
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.