कारखेलमध्ये भरदुपारी घरफोडी
उंडवडी, ता. ९ : भरदुपारी दुचाकीवर आलेल्या तीन चोरट्यांनी कारखेल (ता. बारामती) येथील लळईवस्ती येथे बाळासाहेब कृष्णा मांढरे यांच्या घराचा लोखंडी दरवाजाचा कोयंडा तोडून घरातील कपाट फोडून तब्बल दहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने, तसेच २५ हजार रुपये रोख असा ऐवज लंपास केला. ही घटना मंगळवारी (ता. ९) दुपारी एकच्या दरम्यान घडली.
कारखेल येथील शेतकरी बाळासाहेब मांढरे व त्यांच्या पत्नी सविताबाई घराला कुलूप लावून जवळ असलेल्या शेतातील कांद्यावर औषध मारण्यासाठी गेले होते. घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कटावणीच्या साह्याने दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश मिळवून घरातील कपाट उचकटून दागिन्यांसह रोकड, असा ऐवज चोरून पोबारा केला.
या चोरीमध्ये पाच तोळ्यांचे मंगळसूत्र, कर्णफुले, लहान मुलांचे बदाम, ठुशी यांचा समावेश आहे. घटनेनंतर बाळासाहेब मांढरे यांची पत्नी सविता मांढरे घराकडे परत येत होत्या. त्यांना दूरवरून तोंड बांधलेले तिघेजण घराच्या दारात दिसले. त्यांनी दूरवरून आवाज दिल्यानंतर तिघेही चोरटे दुचाकीवरून पळून गेले. त्यानंतर घरी पोहोचताच दरवाजा तोडलेला व कपाट फोडलेले दिसले. तातडीने शेजाऱ्यांना बोलावून माहिती दिल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले.
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून तपास सुरू केला.
शेतकरी कामावर, घरे टाळ्यांनी बंद
या भागात सध्या खरीप हंगामातील बाजरीची सुगी सुरू आहे. शेतकरी वर्ग दिवसभर शेतातील कामात गुंतलेला असल्याने बहुतांश घरे रिकामी असतात. याच संधीचा फायदा घेत चोरटे घरफोड्या करीत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे वाड्यावस्त्यांवर चोरीची भीती अधिकच वाढली आहे.
UND25B02951
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.