इर्जिक पद्धतीने बाजरीची सुगी शून्य खर्चात पूर्ण

इर्जिक पद्धतीने बाजरीची सुगी शून्य खर्चात पूर्ण

Published on

उंडवडी, ता. १२ : बारामती तालुक्यातील जैनकवाडी गावातील फिनिक्स ॲग्रो फार्मर प्रोड्युसर गट आणि झाशीची राणी महिला शेतकरी गट या दोन गटांनी यंदा खरीप हंगामातील बाजरी काढणी–खुडणी व मळणी इर्जिक पद्धतीने करून उल्लेखनीय बचत साधली. २८ सदस्यांनी एकत्रित राबविलेल्या या उपक्रमामुळे तब्बल ३० एकरातील बाजरीची सुगी शून्य खर्चात पूर्ण झाली आहे.यामुळे सुमारे दोन लाख ४० हजार रुपयांची बचत झाली आहे.

दोन वर्षांपूर्वी पाणी फाउंडेशन व कृषी विभागाच्या माध्यमातून गावात १४ महिलांचा झाशीची राणी महिला शेतकरी गट आणि १४ पुरुषांचा फिनिक्स ऍग्रो फार्मर प्रोड्युसर गट स्थापन झाला. या गटांचे अध्यक्ष अभिजित पवार, सचिव कुमार पवार तसेच महिला गटाच्या अध्यक्षा स्वाती गणेश काळे व सचिव सुनीता माने यांनी एकत्रित काढणी–खुडणी इर्जिक पद्धतीने करण्याचा प्रस्ताव मांडला. सर्व सदस्यांनी एकमताने तो मंजूर करून कामाला सुरुवात केली.

बाजरीच्या सरमाडाचा उपयोग जनावरांच्या चाऱ्यासाठी होत नसल्याने ते बांधावर फेकावे लागत असे किंवा जाळावे लागे. आता ही पद्धत बदलल्यामुळे मातीचा पोत सुधारतो, पुढील पिकासाठी नैसर्गिक खत सहज उपलब्ध होते आणि खर्चही कमी होतो. या अभिनव पद्धतीमुळे पुढील पिकांचे उत्पन्न वाढल्याचे शेतकऱ्यांचे अनुभव आहेत. “सामूहिक प्रयत्नांतून खर्च वाचतो, मातीची सुपीकता वाढते आणि रासायनिक खतांवरील खर्च कमी होतो,” असे गट सदस्य सांगतात.

दरम्यान, जैनकवाडीचा हा प्रयोग परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून गावाने शाश्वत शेतीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकल्याचे कृषी तज्ज्ञांनीही गौरविले आहे.

१७ दिवसांत संपूर्ण काढणी
सामूहिक प्रयत्नांतून केवळ १७ दिवसांत ३० एकर क्षेत्रातील बाजरीची काढणी, खुडणी व मळणी पूर्ण झाली. साधारणतः इतर शेतकऱ्यांना प्रतिएकर आठ हजार रुपये खर्च येतो. या हिशोबाने दोन लाख ४० हजार रुपयांची बचत झाली. या उपक्रमामुळे गावपातळीवर शेतकऱ्यांचा एकोपा आणि परस्पर सहकार्याची भावना अधिक दृढ झाली.

जमिनीत सेंद्रिय कर्बवाढीचा प्रयोग
काढणीनंतर शेतकऱ्यांनी जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी सरमाडाची (बाजरीची उरलेली काडी) कुट्टी करून ती मातीत मिसळण्याचा निर्णय घेतला. यामुळे मातीतील सुपिकता वाढली असून रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी झाले आहे. गटातील सदस्यांनी वेस्ट डी-कंपोजर फवारणी करून कुट्टी लवकर कुजण्यासाठी मदत केली.



02968

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com