माळरानावर उभारली नवकल्पनेच्या जोरावर निर्यातक्षम केळी बाग

माळरानावर उभारली नवकल्पनेच्या जोरावर निर्यातक्षम केळी बाग

Published on

उंडवडी, ता. ११ : ‘माळरान म्हणजे फक्त गुरे चरण्याची जागा’ अशी ओळख असलेल्या अंजनगाव (ता. बारामती) हद्दीतील ओसाड जमिनीवर जळगाव सुपे येथील शेतकरी लक्ष्मणराव जगताप व उद्योजक रामचंद्र जगताप या बंधूंनी परिश्रम, नियोजन आणि नवकल्पना यांच्या बळावर केळी शेतीचा अत्यंत यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे.

केळीच्या प्रयोगातून जगताप यांनी इराणसारख्या परदेशी बाजारपेठेत केळी निर्यात करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणले आहे. त्यांना सुमारे १९५ टन इतके अपेक्षित आहे. त्यातून तब्बल ४० लाख ५० हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळविण्याची अपेक्षा आहे.

बेंगळुरू येथील जी-५ मार्ट कंपनी ही केळी थेट शेतातून येऊन २५ रुपये किलो दराने खरेदी करत असून, ही केळी थेट इराणच्या बाजारपेठेत निर्यात होणार आहे. केळी तोडणीचा शुभारंभ दूध संघाचे माजी अध्यक्ष संदीप जगताप, बारामती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सचिन सातव, खुसरुभाई इमानदार यांच्या हस्ते झाला. यावेळी राजेंद्र रायकर, अनिल लडकत, दिलीप परकाळे बापूराव येडे, रामभाऊ जगताप, बबन जाधव, रवींद्र खोमणे, लक्ष्मण जगताप, नयना जगताप, तसेच जी-५ मार्ट कंपनीचे मॅनेजर सौरभ डोके उपस्थित होते.

माळरानावर हरित क्रांतीचा प्रयोग
जगताप बंधूंनी सन २०२१ मध्ये अंजनगाव परिसरातील वीस एकर माळरानावर साडे पाच एकरांत मायक्रोसन जी–९ जातीची केळी लागवड केली. माळरानावर पाण्याची समस्या असल्याने त्यांनी एक कोटी लिटर क्षमतेची तीन शेततळी तयार केली. ती शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या पाण्याने तसेच पावसाळ्यात विहिरीतील अतिरिक्त पाण्याने भरली जातात. या नियोजनामुळे वर्षभर पाण्याचा अखंड पुरवठा झाला आणि माळरानाचे रूपांतर हिरव्या केळी बागेत झाले.

दृष्टिक्षेपात केळी
- १२ नोव्हेंबर २०२४ मध्ये साडे पाच एकरात एकूण ६५०० केळीच्या रोपांची लागवड
- ठिबक सिंचन, सेंद्रिय खतांचा वापर, वेळोवेळी खतांचे डोस आणि कीड नियंत्रण
- लक्ष्मणराव जगताप यांच्या पत्नी नयना जगताप यांच्याकडून शेतीचे काटेकोरपणे नियोजन
- प्रत्येक घडाचे सरासरी वजन ३० किलो आहे.

उत्पादन खर्च व नफा
साडे पाच एकर शेतीचा एकूण आठ लाख २५ हजार रुपये खर्च झाला असून (एकरी सरासरी खर्च रु १.५ लाख) उत्पादनाचे मूल्य सुमारे रु. ४८ लाख ७५ हजार इतके आहे. खर्च वजा जाता निव्वळ रुपये ४० लाख ५० हजारांचा नफा मिळण्याची अपेक्षा आहे.या खर्चात रोपे, मशागत, शेणखत (एकरी चार ट्रेलर), लागवड, खतांचे डोस, ठिबक सिंचन, केळी बांधणी, आधार दोर, वाहतूक आणि मजुरीचा समावेश आहे.

रोजगारनिर्मिती आणि मार्गदर्शन
शेतीमुळे परिसरातील १० महिला आणि दोन पुरुषांना वर्षभर रोजगार मिळाला आहे. या यशामागे संदीप जगताप, सचिन सातव आणि खुसरुभाई इमानदार या मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. शेतात नियमित भेट देत, मार्गदर्शन व प्रोत्साहन देऊन त्यांनी या प्रकल्पाला आकार दिला.

03041

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com