
नायगाव येथे महिलांसाठी विविध स्पर्धा
उरुळी कांचन, ता. ९ : नायगाव (ता. हवेली) येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी महिलांसाठी संगीत खुर्ची, आभा कार्ड वाटप आदी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महिलांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन डॉ. सुखदा कदम यांनी केले. डॉ. विठ्ठल शेडगे यांनी हृदयविकाराचा झटका आल्यास CPR कसे द्यावे याचे प्रशिक्षण ग्रामस्थांना दिले. बँक ऑफ बडोदा यांच्या वतीने राहुल ठाकरे यांनी महिला दिनानिमित्त बँकेच्या विविध योजना व बँकेची कार्यपद्धती समजून सांगितली. मंडळ कृषी अधिकारी गुलाब कडलक यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, शेततळे योजना, संरक्षित शेती अंतर्गत हरितगृह व शेडनेटबद्दल माहिती सांगितली. कृषी पर्यवेक्षक रामदास डावकर यांनी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, डीबीटी अंतर्गत यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन योजना याबद्दल माहिती दिली. कृषी सहाय्यक महेश सुरडकर यांनी पीक विमा योजना, फळ पीक विमा योजना, अपघात विमा योजनेबद्दल माहिती दिली. ग्रामसेविका विद्या भगत यांनी ग्रामपंचायतीच्या विविध योजनांची माहिती यावेळी दिली.
या वेळी माजी सरपंच राजेंद्र चौधरी, माजी सरपंच गणेश चौधरी, माजी सरपंच कल्याणी हगवणे, माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष हगवणे, माजी उपसरपंच पल्लवी गायकवाड, ग्रामपंचायत सदस्या अश्विनी चौधरी, संगीता शेलार, शालेय शिक्षण समितीच्या उपाध्यक्षा कल्याणी गुळूंजकर, माया चौधरी, मनीषा माने, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय पवार उपस्थित होते.