पालखीचा नगारा अडवणे अंगलट

पालखीचा नगारा अडवणे अंगलट

Published on

उरुळी कांचन, ता. ४ : संत‌ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील नगारा अडवणे उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामस्थांच्या अंगलट आले आहे. नगारा अडवून पालखी सोहळ्यात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी सरपंचांसह १५ ते २० पदाधिकारी व ग्रामस्थांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी अमित कांचन (सरपंच), भाऊसाहेब कांचन (माजी सरपंच), अलंकार कांचन, संतोष ऊर्फ पप्पू कांचन, प्रताप कांचन, राजेंद्र कांचन व इतर १५ ते २० पदाधिकारी व ग्रामस्थांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल राजकुमार भिसे यांनी फिर्याद दिली आहे.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने बुधवारी उरुळी कांचन गावात प्रवेश केला. वर्षानुवर्षं चालू असणाऱ्या परंपरेप्रमाणे पालखी सोहळा आश्रम रोड मार्गे तळवाडी चौकातून गावाला प्रदक्षिणा घालून पुढे यवतला मार्गस्थ होतो. तसेच, उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयातील प्रांगणात दोन तासाच्या विसाव्यासाठी थांबतो. पालखी सोहळा उरुळी कांचन येथे दोन तासांच्या विसाव्यासाठी येणार असल्याने महात्मा गांधी विद्यालयातील प्रांगणात वारकऱ्यांसाठी मंडप उभारला होता. ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून विद्यालयाच्या प्रांगणात हिरकणी कक्ष, महाप्रसाद, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रसाधान गृह आदी सुविधा उपलब्ध केल्या होत्या.
मात्र, यावर्षी संत तुकाराम महाराज सोहळा प्रमुख व विश्वस्तांनी सोहळ्याचा मार्ग बदलला. सोहळ्याच्या प्रवासाचा तपशील पूर्वीच जाहीर केला होता. त्यामध्ये उरुळी कांचन गावातील विसावा रद्द करून, तो उरुळी कांचन फाट्यावर होईल असा उल्लेख केला होता. मात्र, सोहळा प्रमुख व विश्वस्तांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत गावातील नेते मंडळी, पदाधिकारी व ग्रामस्थांनी येथील एलाईट चौकात पालखी सोहळ्याचा नगारा अडवत घोषणाबाजी केली.
या प्रकारानंतर पोलिसांनी सरपंचासह वीस ते पंचवीस पदाधिकारी व ग्रामस्थांवर गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.