रेल्वेसमोर उडी मारून पेठमध्ये आत्महत्या
उरुळी कांचन, ता. ११ : धावत्या रेल्वेसमोर उडी मारून एका ४५ वर्षीय विवाहित पुरुषाने आत्महत्या केल्याची घटना नायगाव - पेठ परिसरातील पुणे- दौंड रेल्वे लोहमार्गावर बुधवारी (ता. १०) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. सतीश लोणकर (वय ४५, रा. पेठ, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
उरुळी कांचन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणकर आपल्या कुटुंबासह पेठ परिसरात वास्तव्यास आहेत. ते उदरनिर्वाहासाठी छोटी-मोठी कामे करत होते. नातेवाइकांनी त्यांना दारुचे व्यसन असल्याची माहिती दिली. या घटनेच्या दोन दिवस आधीही त्यांनी रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, स्थानिकांनी त्यांना थांबवले आणि समजावून सांगितले होते.
परंतु, बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास नायगाव- पेठ परिसरात पुणे- दौंड रेल्वे लोहमार्गावर लोणकर यांनी पुन्हा धावत्या रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केली.