टँकर दुकानात घुसल्याने ३५ लाख रुपयांचे नुकसान
उरुळी कांचन, ता. ५ : नव्याने तयार करण्यात आलेल्या वळणाचा अंदाज न आल्याने ऑइलने भरलेला टँकर दुभाजक ओलांडून थेट टायर दुकानात घुसला. उरुळी कांचन येथे घटना रविवारी (ता. ५) पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात दुकानातील महागड्या मशिनरीचे आणि दुकानासमोर उभ्या असलेल्या तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघातात दुकानातील अलाइनमेंट, बॅलन्सिंग आणि इतर विद्युत यंत्रांचे मोठे नुकसान झाले. यामुळे सुमारे ३० ते ३५ लाख रुपयांना फटका बसला आहे, अशी माहिती दुकानाचे मालक संजय टिळेकर यांनी दिली. जखमी चालकाचे नाव लक्ष्मण वर्मा (वय ३१, रा. बलरामपूर, जि. गोंडा, उत्तर प्रदेश) असे असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, पुण्याहून सोलापूरकडे जात असलेला टँकर (क्र. एमएच ४३ सीके ८९०३) उरुळी कांचन पोलिस ठाण्यासमोरील नव्याने तयार झालेल्या दुभाजकाजवळ अचानक थांबलेल्या वाहनाला वाचवताना चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे टँकरने दुभाजक ओलांडून समोर असलेल्या ‘न्यू अमर टायर्स’ या दुकानात जोरदार धडक दिली. या धडकेत दुकानासमोर उभ्या असलेल्या दोन चारचाकी आणि एका दुचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी आशिष उल्लाळकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी चालकाला रुग्णालयात दाखल केले.
03382