शेतीतील यांत्रिकीकरणामुळे लोहारकाम व्यवसायावर संकट
उत्रौली, ता. १० : सध्या शेती ही आधुनिक पद्धतीने केली जाते. असे असले तरी रब्बी हंगामात खुरपे, विळा, खोरे, कोयता, नांगर, कुऱ्हाड, पाभर, कोळपे आदी अवजारांची आवश्यकता असते. त्यांची निगा, देखभाल, दुरुस्ती लोहार, सुतार करतात. ही कामे करण्यासाठी पिढ्यांनपिढ्या लोहारकाम करणाऱ्यांना भटकंती करावी लागते. मात्र, शेती क्षेत्रातील यांत्रिकीकरणाने या व्यवसायावर आर्थिक संकट आले आहे.
वडगाव डाळ (ता.भोर) येथे तात्पुरत्या स्वरूपात निवारा करून लोहारकाम व्यवसाय करतात. गावात जाऊन आरोळी देऊन काम गोळा करावे लागते. ऐरण, कोळसा, भाता, लोखंड आणि हत्यारांच्या साहाय्याने कोयता, विळी, कुऱ्हाड हत्यारे बनवितात. साधारण चार पाच दिवसात शेतीच्या अवजारांची कामे झाली की दुसऱ्या गावात जाऊन काम करावे लागते. अशावेळी आजारी मुलांनाही बरोबर घेऊन जावे लागते.
शेतीची अवजारे बनविताना उन्हाचा चटका आगीची धग, धूर, अनेकदा ठिणग्या अंगावर पडून फोड, कपड्यांना छिद्रे पडतात. घाव चुकला की ते हातापायावर बसून अपघात घडतात, हातोडीने घाव घालताना खूप अंगमेहनत करावी लागते. मिळणाऱ्या अल्प पैशात कुटुंबांना घरखर्च, मुलांच्या शाळेचा खर्च, अचानक उद्भवणारे आजार यासाठी आजारीपणातही काम करावे लागते. मुलांना शाळेसाठी गावाला कुटुंबांतील वयोवृद्ध व्यक्तींना बरोबर ठेवून गावोगावी फिरावे लागते.
- रामदास साळुंके, लोहारकाम करणारे कारागीर
00035

