कुसेगावमध्ये मुलावर 
वन्यप्राण्याचा हल्ला

कुसेगावमध्ये मुलावर वन्यप्राण्याचा हल्ला

पाटस, ता. २ ः कुसेगाव (ता. दौंड) येथे ओढ्याच्या बाजूला क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या सहा वर्षाच्या मुलावर एका बिबटसदृश्य
वन्यप्राण्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मित्रांनी दाखवलेल्या प्रसंगावधामुळे वन्यप्राणी तत्काळ पळून गेल्याने पुढील अनर्थ टळला. हल्ल्यात मुलाला किरकोळ दुखापत झाली. मात्र, हा वन्यप्राणी बिबट्या की तरस याबाबत संभ्रम निर्माण झाला. दरम्यान, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाने केले.
येथील शितोळेवस्ती भागात सोनबा शितोळे यांचे शेतात राहते घर आहे. बुधवारी (ता. १) सायंकाळी त्यांचा मुलगा राजवीर सोनबा शितोळे (वय, ६) हा ओढ्याच्या बाजूच्या प्रांगणात मुलांसमवेत क्रिकेट खेळत होता. खेळात मग्न असताना बाजूच्या ओढ्याच्या दिशेने एक बिबटसदृश्य वन्यप्राणी राजवीरकडे धावत आला. काही समजण्याअगोदर त्याने राजवीरच्या अंगावर झडप मारली. राजवीर व इतर मित्रांनी आरडाओरडा केला. अखेर गोंधळलेल्या प्राण्याने ओढ्याकडे धूम ठोकली. या हल्ल्यात राजवीरच्या खांद्याला नख्या लागल्या आहेत. मित्रांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला असल्याची भावना वडिलांनी व्यक्त केली. याबाबत पोलिस पाटील गणेश शितोळे यांनी वनविभागाला माहिती दिली. घटनेचे गांर्भीय लक्षात घेऊन वनपरिमंडल अधिकारी शीतल खेंडके, वनरक्षक शीतल मेरगळ, अरुण मदने यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी शिवारात ठशांची पाहणी केली. मात्र, मातीत स्पष्ट ठसे आढळले नाही. घटनेचा पंचनामा केला. त्यांनतर वनअधिकारी यांनी शितोळे कुटुंबाची घरी जाऊन भेट घेतली. मुलाला दवाखान्यात औषध उपचार करून आणल्याचे त्याचे वडील सोनबा यांनी सांगितले. नागरिकांनी सतर्क राहावे, लहान मुलांना शेतात एकटे फिरून देऊ नका, शेतात जाताना विशेष काळजी घ्या, पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावे, असे आवाहन वनअधिकारी शीतल खेंडके यांनी केले.

परिसरात भीतीचे वातावरण...
दौंड कुसेगाव हे मयुरेश्वर वन्यजीव व प्रादेशिक वनविभागाकडे आहे. या भागात बिबट्या, तरस आदी वन्यजीवांचे अस्तित्व आढळून आले. त्यामुळे मुलावर नक्की कोणत्या वन्यप्राण्याने हा हल्ला केला, याविषयी संभ्रम निर्माण झाला. मुलांवरील हल्लेच्या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

कुसेगाव (ता. दौंड)ः बिबटसदृश्य वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाशी संवाद साधताना वनअधिकारी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com