वरवंडमध्ये फांद्या छाटणीत पक्ष्यांचा मृत्यू
वरवंड, ता. ३१ : वरवंड (ता. दौंड) येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पिंपळी झाडाच्या फांद्या छाटल्याने त्यावरील काही पक्षी व त्यांच्या पिलांचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीसमोर चौकात छत्रपती श्री शिवाजी महाराज पुतळ्याच्या पाठीमागे पिंपळीचे झाड आहे.
त्यावर बगळा प्रजातीतील अनेक पक्ष्यांचे वास्तव्य होते. मात्र, त्यांची मोठया प्रमाणात विष्ठा खाली पडत असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे आरोग्याला धोका होण्याची भीती अनेकांनी व्यक्त केली होती. त्यानुसार ग्रामपंचायतीने वनविभागाला लेखी पत्रव्यवहार करून झाडाच्या फांद्या छाटण्याची मागणी केली होती.
मागणीनुसार बुधवारी (ता. ३०) सायंकाळी झाडाच्या फांद्या छाटण्यात आल्या. याची माहिती मिळताच परिसरातील अहिरेश्वर जगताप व इतर पक्षीप्रेमींनी घटनास्थळी जाऊन अनेक पक्ष्यांना फांदीतुन बाहेर काढले. यावेळी काही पक्षी व पिले मृत अवस्थेत आढळून आली. याबाबत त्यांनी वनविभागाला कळविले. वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत पक्षी प्रेमी जमिनीवर पडलेल्या फांदीतुन पक्षी बाहेर काढण्याचे काम करीत होते.
याबाबत जगताप म्हणाले, ‘‘झाडाच्या फांद्या छाटण्या अगोदर त्यावरील पक्षी व पिलांचा विचार करणे गरजेचे होते. मात्र, तसे न केल्याने पक्ष्यांच्या जिवाला धोका झाला. पक्ष्यांची अंडी देखील फुटली गेली. हा प्रकार चुकीचा असून वनविभागाने संबंधितांवर कठोर कारवाई करावी.’’