बिबट्याच्या हल्ल्याचा धसका

बिबट्याच्या हल्ल्याचा धसका

Published on

वरवंड, ता. ९ : दौंड तालुक्यात बिबट्याचा वाढता उपद्रव आणि हिंसकपणाचा पशुधनाला मोठा फटका बसत आहे. दीड वर्षात बिबट्याच्या हल्ल्यात एका बालकासह सुमारे ४५५ पाळीव जनावरांचा मृत्यू झाला. बिबट्याने केलेल्या हल्ल्याबाबत वनविभागाने आर्थिक मदत दिली. संबंधित बालकाच्या नातेवाइकांसह इतर पशुपालक शेतकऱ्यांना वनविभागाने शासकीय नियमानुसार ७८ लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली.
दौंड तालुक्यात शासनाच्या लालफितीत अडकलेल्या पिंजऱ्यामुळे बिबट्यांना अभय मिळत आहे. परिणामी, तालुक्यातील बिबट्यांची संख्या वाढत आहे. वाढत्या संख्येमुळे आपसातील संघर्ष टाळण्यासाठी बिबट्यांनी चक्क आपले कार्यक्षेत्र वाटून घेतल्याचे चित्र आहे. पोटासाठी भटकंती करणारा बिबट्या काही केल्या परिसरातील हद्द सोडायला तयार नाही. त्यामुळे बिबट्याच्या कुटुंबाची शिकारीसाठी कमालीची स्पर्धा दिसत आहे. जनावरांच्या गोठ्यावर येऊन बिबट्या बिनधास्त शिकार करतात. चरायला गेलेल्या मेंढ्या तर कायम संकटाच्या काळ्या छायेत आहेत. बिबट्यांकडून सर्वाधीक मेंढ्या आणि शेळ्यांवर हल्ले होतात. अनेक ठिकाणी घरासमोरील किंवा गोठ्यातील कालवड, पाळीव कुत्रे, शेळ्या, मेंढ्या, गाय, घोडा यांच्यावर हल्ले झाले. तालुक्यात ४५६ पाळीव जनावरांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला विदारक चित्र आहे.
दौंड तालुक्यात यवत वनपरिमंडल कार्यक्षेत्रात सर्वाधिक पाळीव प्राण्यांवर हल्ले झाले. त्या खालोखाल वरवंड वनपरिमंडलाचा क्रमांक आहे. तसेच दौंड वनपरिमंडल कार्यक्षेत्रातील संख्या अत्यल्प आहे. बिबट्याच्या हल्ल्याची माहिती मिळताच वनविभागाचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी जातात. पंचनामा करून वरिष्ठ कार्यालयात नुकसान भरपाईचा प्रस्ताव सादर करीत आहेत. २०२४-२५ मध्ये पशुधनावरील हल्ल्याची ३१२ प्रकरणे झाली. पशुधनासाठी ३७ लाख ४६ हजार ६५० रकमेची नुकसान भरपाई देण्यात आली. तसेच रानडुकरांनी शेतातील पिकनुकसानीची ४ प्रकरणांची एकूण ४० हजार रकमेची नुकसान भरपाई तर बिबट्याच्या हल्ल्यातील जखमीव्यक्तीला ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली. दरम्यान, बोरीपार्धी येथील बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या मुलाच्या नातेवाइकांना २५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली.
दरम्यान, २०२५ ते २०२६ मध्ये १४३ पशुधन हल्ल्याची प्रकरणे दाखल झाली. एकूण १५ लाख ६७ हजारांची नुकसान भरपाई देण्यात आली असल्याचे तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी सांगितले.

तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात ज्या शेतकऱ्यांच्या पशुधनाचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांचा तत्काळ अर्ज घेऊन आम्ही वेळीच प्रस्ताव सादर केले. त्यानुसार वनविभागाकडून बिबट्याच्या वेगवेगळ्या हल्ल्यात बळी पडलेल्या पशुधन आणि इतर प्रकरणांची सुमारे ७८ ते ७९ लाखांपर्यंत नुकसान भरपाई दिली. वनविभागाच्या मदतीमुळे संबंधित नागरीकांना दिलासा मिळाला. बिबट्याच्या हल्ल्यात पशुधन दगावल्यास संबंधित शेतकऱ्यांनी तत्काळ वनविभागाला कळवावे.
राहुल काळे, वनपरीक्षेत्र अधिकारी, ता. दौंड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com