मावळच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

मावळच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

Published on

वडगाव मावळ, ता. १२ : मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्याने शिवप्रेमींनी आनंद व्यक्त केला. या माध्यमातून मावळच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा लागला आहे. किल्ल्याच्या विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
जागतिक वारसा समितीची ४७ वी परिषद फ्रान्समधील पॅरिस येथे झाली. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मराठा साम्राज्यातील बारा शिवकालीन गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळावा यासाठी भारत सरकारतर्फे युनेस्कोला पाठविण्यात आलेला प्रस्ताव सर्वानुमते संमत करण्यात आला. त्यात मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्याचा देखील समावेश झाला आहे. त्यामुळे शिवभक्तांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्याने लोहगडला खऱ्या अर्थाने गतवैभव प्राप्त होईल. लोहगड किल्ला व परिसराचा मोठा कायापालट होईल. जगभरातून पर्यटक हा किल्ला पाहण्यासाठी व अभ्यास करण्यासाठी येतील. नवीन नवीन प्रकल्प या ठिकाणी येतील. पायाभूत सोयी सुविधांचा विकास होईल. मावळचे प्रमुख पर्यटन केंद्र लोहगड होईल. त्यामुळे स्थानिक रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल व पर्यायाने या परिसराचा विकास होईल.

लोहगडचा इतिहास
पुरंदरच्या तहामध्ये मुघलांकडे हा किल्ला गेला होता. सुरतची संपत्ती या ठिकाणी ठेवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा गड. या गडावर नेताजी पालकर, कान्होजी आंग्रे यांचे काही काळ वास्तव्य होते. तसेच पेशवे काळात नाना फडणवीस यांचे पण या किल्ल्यावर वास्तव्य होते. त्यांच्या काळात त्यांनी या गडाची काही डागडुजी केली होती. गडावर सोळा कोन असलेला तलाव आहे, शिवमंदिर आहे, गडाला पाच दरवाजे आहेत. विंचू कडामाची, जिथे सुरतची संपत्ती ठेवली होती अशी लक्ष्मी कोठी, भक्कम बुरुंज, तटबंदी, सुंदर अशा पायऱ्या तसेच गड परिसरामध्ये समोर असलेले तुंग, तिकोना व विसापूर हे किल्ले. जवळची पवना नदी व पवना धरण हे देखील गडाच्या वैभवात भर घालते.
श्री. शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंचातर्फे लोहगडावर गेली २५ वर्षे दुर्गसंवर्धनाचे कार्य सुरू आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून मंचाने सुधारणांची विविध कामे करून घेतली. त्यात नवीन गणेश दरवाजा, गडाला पायऱ्या, बुरुज, तटबंदी आदींच्या दुरुस्तीची कामे चालू झाली. मंच व ग्रामस्थांच्या वतीने लोहगड पायथ्याला शिवभक्तांसाठी प्रेरणादायी शिवस्मारक उभारणी देखील करण्यात आलेली आहे. भारतीय पुरातत्त्व अधिकारी गजानन मुंढावरे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. युनोस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत लोहगडचा समावेश झाल्याबद्दल मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे, मार्गदर्शक संदीप गाडे, अध्यक्ष विश्वास दौंडकर, कार्याध्यक्ष सागर कुंभार, अनिकेत आंबेकर, सचिन निंबाळकर, गणेश उंडे, चेतन जोशी, बसाप्पा भंडारी, अमोल गोरे आदींसह ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

लोहगड विसापूर विकास मंच गेली २५ वर्षे अविरतपणे लोहगड व विसापूर या किल्ल्यांच्या दुर्गसंवर्धनाचे कार्य करत आहे. ‘संघटन मावळ्यांचे, संवर्धन गड किल्ल्यांचे’ या ब्रीद वाक्यानुसार मंचाचे कार्य सुरू आहे. लोहगड पायथ्याला असणाऱ्या शिवस्मारकाचा विकास करून या ठिकाणी भव्य शिवसृष्टी उभी करण्याचा मंचाचा मानस आहे. त्यामुळे येथे जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना शिवरायांचा पराक्रमी इतिहास अनुभवता येईल. यासाठी शासनाच्या वतीने भरघोस मदत मिळावी.
- सचिन टेकवडे, संस्थापक, लोहगड विसापूर विकास मंच

छायाचित्र : लोहगड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com