विकासाची नवभरारी
विकासाची नवभरारी
पारंपरिक शेती, पशुपालन आणि श्रमप्रधान व्यवसायांसाठी ओळखला जाणारा मावळ तालुका आज मोठ्या आर्थिक परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभा आहे. मागील दहा-पंधरा वर्षांत या तालुक्याचे रूपांतर अत्यंत वेगाने घडत आहे. रोजगारासाठी शहरांकडे धाव घेणारा तरुण आता गावातच नवनवीन व्यवसाय उभारत असून, रोजगार घेणाऱ्या पिढीकडून रोजगार देणाऱ्या पिढीकडे त्याचा प्रवास सुरू आहे. मावळाची नवी पिढी स्वावलंबन, आधुनिकता आणि उद्योजकतेची ओळख बनत आहे. आगामी काळात मावळ तालुका राज्यातील प्रगत आणि व्यावसायिकदृष्ट्या सामर्थ्यवान तालुक्यांपैकी एक बनेल असा आशावाद आहे.
- ज्ञानेश्वर वाघमारे
मा वळ तालुका पारंपरिक शेतीप्रधान तालुका म्हणून ओळखला जात होता. परंतु, नैसर्गिक सौंदर्य, भौगोलिक वैशिष्ट्ये, महामार्ग व रेल्वेची सुलभ उपलब्धता, मोठ्या शहरांची जवळीक, वाढते औद्योगीकरण व त्या अनुषंगाने झपाट्याने वाढत असलेले शहरीकरण यामुळे मावळचे आर्थिक व सामाजिक परिवर्तन होत आहे. तालुक्यातील अनेक गावांनी गेल्या काही वर्षांत विकासाची नवी गती पकडली आहे. पुणे-मुंबई महामार्ग, द्रुतगती मार्ग, दळणवळणाच्या सुविधा, शैक्षणिक आणि औद्योगिक प्रकल्पांच्या जवळीकतेमुळे तळेगाव दाभाडे, वडगाव, कामशेत, कान्हे, जांभूळ, सोमाटणे, शिरगाव, गहुंजे या भागांत बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर गृह प्रकल्प उभारले. ग्रामीण भागातील ओसाड माळराने, शेतीपाटे आणि पडीक जमीन आज आधुनिक टाऊनशिप, हाउसिंग सोसायटी आणि व्यावसायिक संकुलाने व्यापलेली दिसते. डोंगर-दऱ्यांनी नटलेल्या या परिसराचे सौंदर्य, स्वच्छ हवामान, पाण्याची मुबलक उपलब्धता आणि तुलनेने परवडणारी जीवनशैली पाहून विशेषतः: मुंबईतील नागरिकांनी यापूर्वीच मावळला सेकंडहोम म्हणून पसंती दिली आहे. आता नोकरी, उद्योग, व्यवसायाच्या निमित्ताने पर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनाही मावळ तालुक्याने आपलेसे केले आहे. त्यामुळे लोकसंख्येचा ओघ वाढला असून, किराणा, हॉटेल, खानावळी, मिनी-लॉजिंग, ट्रान्स्पोर्ट, लॉजिस्टिक सेवा यासारख्या व्यवसायांच्या नव्या संधी स्थानिक तरुणांना मिळत आहेत.
बांधकाम क्षेत्रात जेसीबी, पोकलेन, डंपर, स्टोन क्रशर, रेडी मिक्स, सिमेंट-ब्लॉक उद्योग हे तरुणांचे नवे व्यवसाय ठरत आहेत. अनेक तरुण बिल्डरही झाले आहेत. त्यांनी अनेक बांधकाम प्रकल्प उभारले आहेत. त्यातून रोजगार निर्मिती झाली आहे. महामार्ग आणि औद्योगिक क्षेत्रांच्या विकासामुळे मावळात लॉजिस्टिक सेवा व वेअरहाउसिंग व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. नवलाख उंब्रे, वडगाव, साते, गहुंजे, सोमाटणे, शिरगाव, वराळे, जांभूळ आदी परिसरात मोठ्या प्रमाणात गोदामांची उभारणी झाली आहे. मावळची परंपरागत शेती आज तंत्रज्ञानाधिष्ठित बनत आहे. नव्या पिढीने आधुनिक पद्धती अंगीकारून कृषी व्यवसायाचे वैविध्य वाढवले आहे. अनेक तरुणांनी पॉलिहाऊस उभारून गुलाबांच्या फुलांचे उत्पादन सुरू केले आहे. त्याची परदेशात निर्यात केली जात आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्धता व कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. मावळचे पारंपरिक पीक भात असून अनेक शेतकरी सुधारित पद्धतीने व सेंद्रिय खते वापरून इंद्रायणी भाताचे उत्पादन घेऊ लागले आहेत. यामुळे उत्पादनाचा दर्जा आणि शाश्वतता दोन्ही वाढली आहे. मावळ ॲग्रो कंपनीने इंद्रायणीला मावळचा ब्रँड बनविण्याचा ध्यास घेतला आहे. मावळातील पशुपालन क्षेत्र देखील बदलत्या काळाशी जुळवून घेत आहे. अनेक दूध उत्पादक तरुण शेतकऱ्यांनी अत्याधुनिक दूध काढणी यंत्रणा, चिलिंग युनिट्स, पशुखाद्य सायलो, डिजिटल हेल्थ मॉनिटरिंग आदी अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून दुग्धव्यवसाय अधिक व्यावसायिक बनवला आहे. तालुक्यात शेकडो तरुणांनी कुक्कुटपालन व्यवसायाला आधुनिकतेची जोड दिली आहे. त्यामुळे या क्षेत्रांतही नव्या संधी निर्माण होत असून मावळातील तरुणांचे या व्यवसायांमध्ये प्रमाण वाढते आहे.
पर्यटन क्षेत्राची सोन्याची संधी
मावळच्या डोंगररांगांमध्ये वसलेले किल्ले, लेण्या, गड-किल्ल्यांच्या पायथ्यालगतचा हिरवाईने नटलेला पट्टा, धरणे आणि नद्यांचा परिसर. या सर्वांच्या मिश्रणामुळे मावळ आज ग्रामीण पर्यटनाचा उदयोन्मुख केंद्रबिंदू बनला आहे. पवना, वडिवळे, ठोकळवाडी, कासारसाई, मळवंडी ठुले, आंद्रा आदी धरणांचा परिसर पर्यटकांना आकर्षित करतो आहे. तरुणांनी होमस्टे, फार्मस्टे, कॅम्पिंग साइट, अॅडवेंचर
कॅम्प, ट्रेकिंग मार्गदर्शन, वॉटर अॅक्टिव्हिटी यासारखे अनेक पर्यटन व्यवसाय उभे केले आहेत. सोशल मीडिया प्रमोशन आणि ऑनलाइन बुकिंगमुळे पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. स्थानिकांना भोजन, निवास, बोटिंग, वाहतूक आदी क्षेत्रांमध्ये रोजगार मिळत आहे. तालुक्यातील लोहगड किल्ल्याचे नुकतेच जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नामांकन झाले आहे. त्यामुळे या परिसरातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.
शैक्षणिक हबकडे वाटचाल
मावळ तालुक्यात प्राथमिक शिक्षणापासून उच्चशिक्षणापर्यंत अनेक संस्था उभ्या राहिल्या आहेत. दहावी-बारावीनंतर पोलिस भरतीपासून बँकिंग, लष्करी सेवा, तांत्रिक, स्पर्धा परीक्षा यासाठी विद्यार्थ्यांची तयारी वाढली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही उच्च शिक्षणाबाबत जागृती वाढली आहे. ग्रामीण परंपरा, नैसर्गिक संपदा, तरुणांची ऊर्जा आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर या सर्वांच्या संगमातून मावळ तालुका आज बहुआयामी विकासाच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करीत आहे. जेमतेम शिक्षण झालेल्या तरुणांना गावातच उद्योग-व्यवसाय वाढल्याने शहराकडे स्थलांतराची गरज कमी होत आहे. मावळातील युवकांनी परंपरेची सांगड आधुनिक तंत्रज्ञानाशी घालून नवीन विकासाचा मार्ग उघडला आहे. स्थानिक पातळीवर निर्माण होणाऱ्या लघु उद्योगांपासून ते डिजिटल उद्योजकतेपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये वाढ झाली असून, गाव सोडून शहराकडे जाण्याची गरज कमी होत आहे. मावळच्या विकासाची ही वाटचाल आगामी काही वर्षांत महाराष्ट्राच्या प्रगत तालुक्यांमध्ये मावळला अग्रस्थान मिळवून देईल, अशी आशा आहे.
तालुक्याचे ठिकाण विस्तारले
मावळ तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेले वडगाव शहर गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. पूर्वी केवळ पुणे मुंबई महामार्ग व लोहमार्गाच्या मध्यभागी असलेल्या गावठाणापुरते गावाचे क्षेत्र मर्यादित होते. मात्र, आता पूर्वेला तळेगावच्या शिवेपर्यंत, पश्चिमेला ब्राम्हणवाडी गावापर्यंत, दक्षिणेला असणाऱ्या डोंगर रांगे पर्यंत तर उत्तरेला सांगवी गावापर्यंत गावाचा विस्तार झाला आहे. वाढते नागरीकरण लक्षात घेऊन बांधकाम व्यावसायिकांनी छोटे मोठे गृहप्रकल्प उभारले आहेत. विशेष म्हणजे अनेक स्थानिक तरुणांच्या पुढाकारातून ते उभारले आहेत. येथे नव्याने बांधण्यात येत असलेली बहुउद्देशीय प्रशासकीय इमारत, नियोजित जिल्हा सत्र न्यायालय इमारत, रेल्वे गेटच्या ठिकाणी होणारा उड्डाणपूल आदी कामे पूर्णत्वास गेल्यानंतर शहराच्या विकासाला आणखी चालना मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

