
तरडोलीत पत्रकारावर चौघांकडून हल्ला
वडगाव निंबाळकर, ता. ६ : तरडोली (ता. बारामती) येथील पत्रकार व मयुरेश्वर देवस्थानचे विश्वस्त विनोद पोपट पवार यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी मंगेश जगताप (रा. मुर्टी, ता. बारामती), सागर शिनगारे (रा. पांडेश्वर, ता. पुरंदर) यांच्यासह अनोळखी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी (ता. ४) सकाळी तरडोलीतील जमीन गट क्रमांक ५२३ मध्ये ही घटना घडली.
‘मोरया डेव्हलपर्स’मधील प्लॉटींगमध्ये क्षेत्र कमी पडत असल्याच्या कारणावरून जगताप व शिनगारे यांनी पवार यांना शिवीगाळ, दमदाटी केली. त्यांच्यासोबत असलेल्या अनोळखी चौघांनी, ‘याला आता सोडायचे नाही, जिवंत मारून उसात टाकून देऊ,’ अशी धमकी दिली. जगताप व शिनगारे यांनी हातातील उसाने फिर्यादीच्या छातीवर मारून जखमी केले. इतर चौघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यातील दोघांनी फिर्यादीला लाकडी काठीने; तर अन्य दोघांनी हातातील लोखंडी कडे हातात घेऊन फिर्यादीच्या डोळ्यावर मारून गंभीर दुखापत केली. फिर्यादीचे वडील पोपट नामदेव पवार हे तेथे सोडविण्यासाठी आले असताना जगताप व शिनगारे यांनी त्यांनाही उसाने मारहाण केली. दोघांनी फिर्यादीच्या अंगावर बसून जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांचा गळा दाबत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.