
वणवा लावणाऱ्याचे नाव कळविल्यास बक्षीस
वडगाव निंबाळकर,ता. २७ : बारामती तालुक्यातील वनपरिक्षेत्रात गेल्या काही दिवसात वणवा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये वनसंपदा जळून नष्ट होत असल्यामुळे यावरील उपाय योजना म्हणून वनविभागाने वणवा लावणाऱ्याचे नाव कळवणाऱ्याला बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा केली असल्याची माहिती बारामती वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर यांनी दिली.
तालुक्यातील विविध भागात एकूण ६ हजार ५३६ हेक्टर क्षेत्र वनविभागाच्या हद्दीत येथे यामध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती आहे. वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या सर्वच वनक्षेत्रावर लक्ष ठेवण्यासाठी सरकारी यंत्रणा अपुरी पडते वन कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित आहे\ यामुळे स्थानिक नागरिकांनी वनसंरक्षणासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या गावची नैसर्गिक साधन संपत्ती जपण्यासाठी स्थानिक रहिवासी आणि पर्यावरण प्रेमींनी पुढाकार घेतला तर लोक सहभागातून वनसंरक्षण होईल. आपल्या जवळपास वनविभागाच्या हद्दीत कोणी जाणीवपूर्वक वणवा लावत असल्याचे आढळून आल्यास तत्काळ वन विभागाला कळवावे यामुळे संबंधितांना बोलावून चौकशी करता येईल. दोषी व्यक्तींचे नाव कळवणाऱ्याला बक्षीस देण्यात येणार आहे.
संशयितांची नावे कळावा
गेल्या दोन महिन्यात मुढाळे, पणदरे, तांदूळवाडी, गाडीखेल, कोऱ्हाळे बुद्रुक या ठिकाणी जाळपट्ट्या तयार करूनही आग लागण्याच्या घटना घडल्या सुमारे ४० हेक्टर क्षेत्रावरील वनसंपदा नष्ट झाली. जाणीवपूर्वक कोणीतरी कृत्य करीत आहे. सुजाण नागरिकांनी संशयितांची नावे कळवावीत, असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.
कोऱ्हाळे बुद्रुक ग्रामस्थ वन संवर्धन बाबत सहकार्याच्या भूमिकेत असतात ग्रामस्थांना विश्वासात घेउन वन अधिकाऱ्यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घ्यावा.
- रवींद्र खोमणे, सरपंच कोऱ्हाळे बुद्रुक
दरवर्षी वृक्ष लागवड होते पण संवर्धनासाठी लोकांचे सहकार्य अपेक्षित आहे. निसर्गप्रेमींनी झाडांबाबत आपलेपणाची भावना ठेवून संवर्धनासाठी पुढे आले तर परिसरात देशी जंगली झाडे वाढून पक्ष्यांचा वावर वाढेल.
- योगेश कोकाटे, वनरक्षक