वडगाव येथील वितरिका बुजविली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडगाव येथील वितरिका बुजविली
वडगाव येथील वितरिका बुजविली

वडगाव येथील वितरिका बुजविली

sakal_logo
By

वडगाव निंबाळकर, ता. १४ : वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील होळ रोडवरील बनकर वस्तीनजीक असलेली ११ नंबर वितरिका (फाटा) मशिनच्या साह्याने रविवारी (ता. १२) रात्री बुजविण्यात आली.
गेल्या सहा महिन्यांपूर्वी येथील शेतकऱ्यांनी प्लॉटिंगसाठी क्षेत्र विक्रीला काढले होते. संबंधिताने वितरीकेला कुंपण घातले होते. याबाबत ''सकाळ''मधून ''वितरिका बंदिस्त केल्यामुळे शेतकरी आक्रमक'' अशा आशयाची बातमी दिली होती. याबाबत परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतचा जाब विचारला होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पाणी वापर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मशिनच्या साह्याने अतिक्रमण हटवले. यावेळी संबंधितांना समज देण्यात आली होती. परंतु सहा महिन्यानंतर पुन्हा रात्रीच्या वेळी थेट वितरिकाच बुजवण्यात आली. दुसऱ्या बाजूने पाणी काढून देण्यासाठी चारी केली आहे. शेतात केलेले प्लॉटिंग यामध्ये वितरिका अडथळा ठरत असल्यामुळे वितरिकेचा मार्ग बदलण्याचा घाट प्लॉटिंगवाल्यांनी घातला आहे. गेल्या चार महिन्यांपासून संबंधितांना नोटीस बजावूनही सरकारी मालमत्तेचे नुकसान केले जात असल्यामुळे यांना पाटबंधारे खात्यातील अधिकारीच पाठीशी घालत असल्याने बेकायदेशीर कृत्य करण्याचे धाडस वाढत आहे. सहा महिन्यापूर्वी वितरिकेला कुंपण घातले यावेळी योग्यती कारवाई झाली नसल्यामुळे थेट वितरिका बुजविण्याचेच धारिष्ट झाले. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, सोमवारी (ता. १३) दुपारी वडगाव निंबाळकर पाटबंधारे शाखाधिकारी बाजीराव पोंदकुले शरद मोरे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

01801