
वृक्ष लागवड करून केले अस्थींचे विसर्जन
वडगाव निंबाळकर, ता. १७ ः आईचे जगणे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गेले. जिद्दीने संसार करीत पोरांना उच्च शिक्षण देऊन संस्काराचे धडे दिले. तिच्या स्मृतिनिमित्ताने कोकरे कुटुंबातील सदस्यांनी रक्षा विसर्जन नदीत न करता घराशेजारी वृक्षारोपण करुन आदर्श निर्माण केला.
पणदरेनजिक धुमाळवाडी (ता. बारामती) येथील कोकरे वस्तीवरील कृष्णाबाई वामन कोकरे (वय ८०) यांना नुकतीच देवाज्ञा झाली. सावडण्याच्या दिवशी अस्थिविसर्जन प्रचलित पद्धतीप्रमाणे नदीपात्रात करतात, येथील ग्रामीण कथाकार प्रा. रवींद्र कोकरे यांनी अस्थी विसर्जन पाण्यात न करता घराजवळ किंवा शेतामध्ये एक झाड लावून यामध्ये अस्थी व राख विसर्जन करत दिवंगत व्यक्तीच्या स्मृती जतन कराव्यात यासाठी जनजागृती सुरू केली आहे. याला परिसरात प्रतिसादही मिळत आहे. कोकरे कुटुंबातील दादासाहेब, तुकाराम, ज्ञानदेव यांच्यासह तीन मुली यांनी सामाजिक जाणिवेतून या उपक्रमाला प्रतिसाद देत घराजवळ वृक्ष लावून अस्थी विसर्जित केली. प्रवाही पाण्याचे प्रदूषण कमी व्हावे आणि वृक्ष लागवड व्हावी, यासाठी पंचक्रोशीत रक्षाविसर्जन रानातच करुन वृक्ष लागवड चळवळ सुरू आहे.
----------------------------