नीरा- बारामती मार्गावरील पुलांवर गवत

नीरा- बारामती मार्गावरील पुलांवर गवत

Published on

वडगाव निंबाळकर, ता. ३० ः वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील ओढ्यावर असलेल्या पुलाच्या कडेने गवत उगवल्याने रस्त्यावर पाणी साचून राहते. परिणामी दरवर्षी पुलावर खड्डे पडतात, दुरुस्तीही दरवर्षी होते. अशीच परिस्थिती नीरा- बारामती मार्गावरील सर्व पुलांवर पाहायला मिळते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या छोट्या दुर्लक्षित कारणांमुळे शासनाला मोठा खर्च करावा लागत आहे.
नीरा- बारामती मार्गावर रुंदीकरणाचे काम सुरू आहे. सुमारे ४० किलोमीटर अंतराच्या मार्गावरील ओढा, कालवा, वितरिका यावर छोटे- मोठे १६ पूल आहेत. पावसाळ्यात पुलाच्या बाजूने साठलेल्या मातीवर गवत उगवते. परिणामी पुलावर छोटा बांध तयार होतो. यामुळे पुलावरील पाणी खाली वाहून जात नाही. साचून राहिलेल्या पाण्यामुळे रस्त्यावर खड्डे होतात. पुलावरून कडेने चालणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावर वाहनांचे पाणी उडते, यामुळे चालणे धोकादायक बनते.
पावसाळ्यानंतर खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतली जाते. सर्व पुलांवर छोटासा डांबरी थर दिला जातो. दरवर्षी होत असलेल्या या प्रकारामुळे बाजूच्या संरक्षण कठड्याची उंची कमी होते, तर रस्त्याची जाडी वाढते. प्रत्येक पुलावर डांबराचा सुमारे दीड फूट उंचीचा थर तयार झाला आहे. असेच चालू राहिले तर स्लॅबच्या जाडीपेक्षा डांबराच्या थराची जाडी जास्त होऊन संरक्षण कठडे बदलण्याची वेळ येईल.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने वेळच्यावेळी रस्त्याच्या कडेने दुरुस्तीची कामे केली जात नाहीत. पुलावर साठलेली माती काढणे, रस्त्यावर आलेली झुडपे वेळच्या वेळी तोडणे, यासारखी छोटी कामे केली जात नाहीत. छोट्या कारणांमुळे दुरुस्तीसाठी शासनाचा मोठा खर्च होत आहे.

काटेरी झुडपे काढण्याची मागणी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष असल्यामुळे रस्ते चकाचक आहेत. रुंदीकरणासारख्या मोठ्या कामाकडे सर्व अधिकाऱ्यांचे लक्ष असते. परंतु छोट्या गोष्टींकडेही लक्ष द्यावे, रस्त्यालगतची काटेरी झुडपे वाहन चालकांना अडथळा करत असल्याने त्वरित काढण्यात यावीत, अशी मागणी प्रवासी, ग्रामस्थांकडून होत आहे.

गेल्या वर्षी ग्रामपंचायतच्या वतीने पुलावरील गवत काढण्याचे काम केले होते. ग्रामस्थांच्या याबाबत तक्रारी आल्या असून सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवले आहे ग्रामपंचायत कडून लवकरच स्वच्छता करण्यात येईल.
- सुनील ढोले, सरपंच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com