‘ग्रामपंचायतीच्या उत्पन्नवाढीचा नवा निर्धार’
वडगाव निंबाळकर, ता. १२ : ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उत्पन्न वाढीचे वेगवेगळे पर्याय निवडले पाहिजेत, यासाठी प्रयत्नशील राहून विकासाला चालना दिली जाईल, असा निर्धार एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसद बैठकीत बारामती तालुक्यातील सरपंचांनी केला.
तालुक्याच्या सर्वांगीण ग्रामविकासाला उपयोगी होतील अशा उपक्रमांच्या कार्यवाहीबाबत विचार विनिमयासाठी एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेची बैठक वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथे नुकतीच पार पडली. यावेळी कार्याध्यक्ष योगेश पाटील, उपाध्यक्ष प्रकाश महाले, जिल्हाध्यक्ष रेखा टापरे, सागर दराडे आदींनी सरपंचांना मार्गदर्शन केले. तसेच, विविध गावातून आलेल्या सरपंचांनी आपल्या कामकाजातील अनुभव कथन केले. यापुढे विकासाला गती द्यायची असेल तर फक्त शासकीय योजनांवर अवलंबून न राहता उत्पन्न वाढीचे विविध पर्याय ग्रामपंचायतीने शोधले पाहिजेत यासाठी काय करता येईल, याबाबत आपले विचार व्यक्त करून उपस्थित सरपंचांची समस्या जाणून घेतल्या
याप्रसंगी मोरगावचे सरपंच नीलेश केदारी, करंजेचे भाऊसाहेब हुंबरे, मुढाळेचे जयपाल साळवे, वंजारवाडीचे जगन्नाथ वणवे, पळशीच्या ताई काळे, मासाळवाडीचे मुरलीधर ठोंबरे, कोऱ्हाळेचे सदस्य विठ्ठल पवार आदी उपस्थित होते. सरपंच सुनील ढोले यांनी प्रास्ताविक केले. उपसरपंच संगीता शहा यांनी आभार मानले.

